`पेव्हर ब्लॉक' उद्योगाने दिले हजारो हाताना काम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

`पेव्हर ब्लॉक' उद्योगाने दिले हजारो हाताना काम 

`पेव्हर ब्लॉक' उद्योगाने दिले हजारो हाताना काम 

जळगाव : बांधकाम क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून पेव्हर ब्लॉकचा वापर वाढू लागला. मोठ्या इमारती व प्रकल्पांच्या ठिकाणी विशेषत: वाहनतळावर वापरण्यात येणारे पेव्हर ब्लॉकचे युनिट जळगावातही प्रस्थापित झाले. जळगाव शहरासह जिल्ह्यात जवळपास 30-35 युनिट असून त्यातून दीड हजार कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. अर्थकारणाचा विचार केला तर या उद्योगातून वार्षिक सुमारे 30 कोटींची उलाढाल होत असून, हा उद्योग चांगलाच प्रस्थापित झाला आहे. 
मोठ्या इमारतींच्या योजना, शासकीय इमारतींचा परिसर, उद्याने, पार्क, प्रतिष्ठाने, कंपन्यांचे वा महाविद्यालयांचे प्रांगण अशा एक ना अनेक ठिकाणी रंग-बिरंगी पेव्हर ब्लॉक सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. पार्किंग टाईल्सला टिकाऊ पर्याय म्हणून पेव्हर ब्लॉकचा वापर आता बऱ्यापैकी सर्वत्रच होऊ लागला आहे. अगदी ग्रामीण भागातही रस्ते, ग्रामपंचायती व अन्य कार्यालयांच्या परिसरात पेव्हर ब्लॉक दिसू लागले आहेत. स्वाभाविकत: या पेव्हर ब्लॉकची मागणी वाढल्याने पुरवठा करणारे प्रकल्प जळगावसह खानदेशात प्रस्थापित होऊ लागलेत. 

दोन दशकांपूर्वी सुरवात 
मुंबई, पुण्यापुरतेच मर्यादित असलेले पेव्हर ब्लॉक उत्पादनाचे युनिट जळगावात सुरू झाले ते दोन दशकांपूर्वी. सचिन अमळकर यांनी 1996-97 मध्ये औद्योगिक वसाहत परिसरात सिमेंटच्या उत्पादनाच्या युनिटमध्ये पेव्हर ब्लॉक निर्मितीचे काम सुरू केले. त्यानंतरच्या टप्प्यात जशी पेव्हर ब्लॉकला मागणी वाढू लागली, तसा त्याचा पुरवठा करणारे अनेक नवीन युनिट सुरू होऊ लागले. एकट्या जळगाव शहरात आज दहा-बारा उद्योग कार्यरत असून, त्यात चार-पाचशेवर कामगार काम करतात. 

असा बनतो ब्लॉक 
पेव्हर ब्लॉक वाळू, खडी, सिमेंट या तीन घटकांपासून तयार होते. मशिन प्रेस व व्हायब्रेटरी रबर मोल्ड अशा दोन पद्धतीद्वारे हे ब्लॉक तयार केले जातात. त्यापैकी मशीन प्रेस पद्धतीत तयार झालेले ब्लॉक अल्पावधीत म्हणजे अगदी दोन-तीन दिवसांत 70 टक्के मजबूत होऊन वितरणासाठी तयार होतात. तर व्हायब्रेटरी पद्धतीत स्टील मोल्ड तंत्रज्ञान वापरले जाते, यात ब्लॉकवर किमान पंधरा दिवस तरी पाणी मारावे लागते, तेव्हा ते 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत मजबूत होतात. या ब्लॉकच्या चाचणीसाठी "आयएस 15658' या कोडवर आधारित तपासणी केली जाते. आपल्या भागात उन्हाळ्यात प्रचंड तापमान असते, त्या तापमानात लाल व पिवळा रंग अधिक टिकू शकतो, म्हणून याच रंगांचे ब्लॉक अधिक वापरले जातात. 

याठिकाणी उपयुक्त 
सुंदर, आकर्षक व टिकाऊ असे हे पेव्हर ब्लॉक, शासकीय इमारतींचा परिसर, उद्यानांमधील पार्किंग, जॉगिंग ट्रॅक, पार्कमधील मोकळ्या जागा, मोठ्या इमारतींच्या स्कीम्सच्या वाहनतळासाठी, रेल्वेस्थानक, बसस्थानकासह शाळा, महाविद्यालये, विविध कंपन्या, प्रतिष्ठाने, चित्रपटगृहांसमोरील प्रांगणात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अगदी ग्रामीण भागात खेड्यांमध्येही शाळांच्या प्रांगणासह गावातील काही प्रमुख रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. 
------ 
जळगावात दहा-बारा युनिट्‌स 
जळगाव शहरात पेव्हर ब्लॉक निर्मिती करणारे दहा ते बारा युनिट्‌स आहेत. प्रत्येक युनिटमध्ये पंधरा-वीस कामगार कार्यरत असून, त्यातील बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. कुशल कामगारांना या कंपनीत चांगला रोजगार मिळतो. काही कंपन्यांत पती-पत्नी दोघेही काम करतात. जळगाव जिल्ह्यात 25-30 युनिट्‌स असून, या उद्योगातून वार्षिक 25-30 कोटींची उलाढाल होत आहे. 
------- 
चौकट 
जैन उद्योग समूहाचेही युनिट 
जैन उद्योग समूहाला त्यांच्या कंपन्यांतर्गत प्रकल्प, शाळा, उद्याने, पार्क, गेस्ट हाउस यासह मालमत्तांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा उपयोग होतो. मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे लक्षात घेऊन जैन उद्योग समूहाने पेव्हर ब्लॉक तयार करणारे युनिटच सुरू केले. या युनिटच्या माध्यमातून तयार होणारा माल ते त्यांच्याच प्रकल्पांमध्ये उपयोगात आणत असतात. अर्थात, तेवढ्यावर त्यांची गरज भागत नसून इतर ठिकाणांहून त्यांना माल खरेदी करावा लागतोच. 
------ 
इन्फो.. 
महाराष्ट्रातील तिसरा उद्योग जळगावात 
साधारण दोन दशकांपूर्वी पेव्हर ब्लॉक हे उत्पादन चर्चेत आले. मुंबई-पुण्यात वापरले जाणारे व तेथेच तयार होणारे ब्लॉक राज्यात इतर कुठेही तयार होत नव्हते. महाराष्ट्रातील पेव्हर ब्लॉक बनविणारी तिसरी फॅक्‍टरी आम्ही जळगावात 1996-97 ला सुरू केली. त्यानंतर या क्षेत्रात बऱ्यापैकी क्रांती झाली असून, अलीकडच्या काळात ब्लॉकला मागणी चांगलीच वाढली आहे. 
- सचिन अमळकर, 
संचालक, मासूम इंडस्ट्रीज. 

Web Title: marathi news jalgaon kam