खडसेंनी ट्रॅक्‍टरचा घेतला ताबा...आणि संपूर्ण गाव केले निर्जंतुकीकरण ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

पक्षाने रविवारी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लॉकडाऊनच्या काळात निराधार लोकांसाठी अन्नछत्र व अन्य सुविधा देण्याबाबत आवाहन केले. पंतप्रधान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आवाहनानुसार आम्ही मुक्ताईनगरात हा उपक्रम सुरु केला आहे. हे करताना "सोशल डिस्टन्सिंग' काटेकोरपणे पाळले जात आहे. 
- एकनाथराव खडसे (माजीमंत्री) 

जळगाव  : माजीमंत्री एकनाथराव खडसे आज कुठल्याही संविधानिक पदावर नसतानाही त्यांची लोकांप्रती असलेली सेवावृत्ती व दातृत्व कमी झालेले नाही. माजी आमदार म्हणून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनासह त्यांच्याजवळी काही निधीच्या माध्यमातून त्यांनी या लॉकडाऊनच्या काळात मुक्ताईनगरातील निराश्रितांसाठी अन्नछत्र सुरु केले आहे. काही प्रसंगी शेतात ट्रॅक्‍टर चालविताना दिसणाऱ्या खडसेंनी या ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून आज गाव परिसरात जंतुनाशकाची फवारणीही केली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे लोकनेते का आहेत, त्याचा प्रत्यय नेहमीच येतो. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात "लॉकडाऊन' जाहीर करण्यात आल्यानंतर गावोगावी, शहरांमध्ये अनेक निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या निराधारांना निवारा व दोनवेळचे भोजन मिळावे म्हणून खडसेंनी पुढाकार घेत मुक्ताईनगरात अन्नछत्र सुरु केले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांना माजी आमदार म्हणून मिळणारे निवृत्ती वेतन व इतर निधीचे साहाय्य करत हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज या अन्नछत्राचा हजार- बाराशे निराधार लोक लाभ घेत आहेत. 

ट्रॅक्‍टरद्वारे केली फवारणी 
आपल्या शेतात, मळ्यात ट्रॅक्‍टरवर बसून काळ्या मातीची सेवा करणारे खडसे याआधी सर्वांनीच पाहिले आहेत. आज हेच ट्रॅक्‍टर घेऊन खडसेंनी गाव परिसरात जंतुनाशकाची फवारणी केली. मुक्ताईनगर नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. त्यासाठी खडसेंनी हे ट्रॅक्‍टर उपलब्ध करुन दिले. पण, त्याआधी स्वत: ट्रॅक्‍टरवर बसून त्यांनी ही फवारणी केली. त्यांचा हे ट्रॅक्‍टर चालवितानाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Khadas take control of the tractor and make the whole village sterile!