मी अर्ज भरला असता तर भाजपचे सात आमदार फुटले असते; खडसेंचा गौप्यस्फोट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

पुन्हा एकदा खडसेंसह डावलण्यात आलेले वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यास मिळत आहे. या चारही बड्या नेत्यांना का डावलण्यात आले? याचे कारण देखील अजून समोर आलेले नाही. ​

जळगाव : विधानपरिषद उमेदवारी निवडीसाठी निवडणूक होवून उमेदवारांची निवड झाली. या विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर होती. कॉंग्रेसची उमेदवारी घेवून अर्ज भरला असता तर कदाचित भाजपच्या आमदारांनी मला वोटींग केले असते. या पाच ते सात आमदारांनी तसे स्वतः माझ्याकडे बोलून दाखविल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. 

विधानपरिषदेच्या उमेदवार निवड प्रक्रिया नुकताच पार पडली. यात भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पक्षातील मोठे नेते ज्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली. यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी आहेच; एकनाथ खडसे यांनी तर तसे उघडपणे नाराजी व्यक्‍त केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाल्याचे देखील खडसे यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. 

का डावलले नेत्यांना 
भाजपने गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील दिग्गज नेत्यांचे तिकीट कापत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेची उमेदवारी देताना देखील बड्या नेत्यांना डावलले आहे. विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. अजित गोपचडे, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके यांचे नाव निश्‍चित केले. यामुळे पुन्हा एकदा खडसेंसह डावलण्यात आलेले वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यास मिळत आहे. या चारही बड्या नेत्यांना का डावलण्यात आले? याचे कारण देखील अजून समोर आलेले नाही. 

फडणवीसांचे वर्चस्व कायम 
विधानसभा निवडणुक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. पक्षातील दिग्गज नेत्यांना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता विधानपरिषदेत देखील पुन्हा एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवण्यात आले. यामुळे पक्षात अजूनही फडणवीसांचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khadse statement bjp MLA vidhanparishad election