"लॉकडाउन'चा नद्यांच्या प्रदूषणस्तरावर परिणाम नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

देशातील प्रमुख नद्यांच्या काठी मोठमोठ्या कंपन्या आहेत. "लॉकडाउन'मुळे या कंपन्या बंद असल्याने "गंगा,' "यमुना,' मुंबई व पुण्यातील नद्यांमधील जलप्रदूषण कमी होणे स्वाभाविक आहे. जळगाव जिल्ह्यात इंडस्ट्रीच विकसित न झाल्याने आपल्याकडील नद्यांचे प्रदूषण "जैसे थे'च असेल. 
- सुरेंद्र चौधरी, अभियंता व पर्यावरणतज्ज्ञ 

जळगाव : "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील "लॉकडाउन'मुळे जळगाव जिल्ह्यात वायू व ध्वनिप्रदूषणाचा स्तर घटला असला, तरी जलप्रदूषणाचा स्तर घटल्याचे कुठलेही प्रमाण अद्याप समोर आलेले नाही. अर्थात, आपल्या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र अत्यल्प आणि त्यातही प्रमुख नद्यांच्या काठी तर उद्योगच नसल्याने नद्यांच्या प्रदूषणाच्या स्तरावर काहीही परिणाम झालेला नाही. 
"कोरोना' संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, देशभरात 24 मार्चपासून "लॉकडाउन' जारी करण्यात आले असून, त्या दिवसापासून संपूर्ण देशभरातील रेल्वे, सार्वजनिक बससेवा, खासगी बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे. खासगी वाहतुकीची कार, दुचाकी आदींच्या वाहतुकीवरही बंदी आहे. जीवनावश्‍यक वस्तू, आपत्कालीन सेवांना यातून वगळले असून, त्याशिवाय सर्व कंपन्याही बंद आहेत. मानवावर आपत्ती आणणाऱ्या या स्थितीत निसर्ग मात्र प्रदूषणाच्या विळख्यापासून बाजूला होत मोकळा श्‍वास घेत आहे. त्याचा परिणाम थेट जल, वायू व ध्वनिप्रदूषणावर झाला असून, या तिन्ही घटकांच्या प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे.  
"लॉकडाउन'मुळे वाहने व कंपन्यांची चाके बंद असल्याने देशभरातील मोठ्या व औद्योगिक शहरांमध्ये प्रदूषणस्तर कमालीचा घटल्याचा परिणाम स्पष्टपणे समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातही वाहतूकच बंद असल्याने वायुप्रदूषणाचा स्तर जवळपास 60 टक्‍क्‍यांनी घटल्याचे सांगितले जात आहे. 
 
जलप्रदूषणाचा स्तर कायम 
असे असले तरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रदूषणाचा स्तर कोणत्याही स्वरूपात घटलेला नाही, असे चित्र दिसते. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी आपल्याकडे वाहने, कंपन्या बंद झाल्यामुळे काहीसे वायुप्रदूषण घटले, असे म्हणता येईल. मात्र, जलप्रदूषणावर त्याचा परिणाम झालेला नाही, असा दावा या तज्ज्ञांनी केला. 
 
जलप्रदूषण "जैसे थे'ची कारणे 
- औद्योगिक क्षेत्र मोठे नाही 
- कंपन्यांची संख्या कमी 
- केमिकल्स कंपन्याही अत्यल्प 
- रसायने उत्सर्जित करणारे कारखाने नाहीत 
- नदीकाठी मोठे उद्योग नाहीत 
 
सांडपाण्यावर प्रक्रिया नसल्याने प्रदूषण कायम 
जळगाव जिल्ह्यातील "तापी,' "गिरणा,' "वाघूर,' "बोरी,' "बहुळा' यांसारख्या प्रमुख नद्यांमधील प्रदूषण प्रामुख्याने सांडपाण्याने होत असते. आपल्याकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोणत्याही महापालिका, पालिकेकडे नाही. त्यामुळे "लॉकडाउन' असले, कंपन्या बंद असल्या तरी सांडपाणी सुरूच आहे, उलटपक्षी ते वाढले असेल. त्यामुळे नद्यांमधील प्रदूषण मात्र कुठेही कमी झालेले दिसत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown no effect river pollution