प्लॅस्टिक उद्योगाला हजार कोटींवर फटका! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

पीव्हीसी पाइप, ठिबक नळ्यांचे उत्पादन सुरू झाले असले, तरी त्याला मार्केटमधून मागणी येत नाही, तोवर हे उत्पादन विकणार कुठे, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे 100 टक्के क्षमतेने आम्ही उत्पादन करून ठेवू शकत नाही. बाजारपेठ खुली झाल्यानंतर काय स्थिती निर्माण होते, मागणी कशी राहते, त्यावर उत्पादनाचे प्रमाण ठरेल. 
- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, पीव्हीसी पाइप मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशन, जळगाव 

जळगाव : "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी "लॉकडाउन' सुरू असून, त्याला महिना लोटला आहे. या महिनाभरात जळगावातील पीव्हीसी पाइप व ठिबकचे सुमारे 250 व चटईचे 150 युनिटस्‌ पूर्णत: बंद होते. त्यामुळे प्लॅस्टिकवर आधारित या उद्योग क्षेत्राला या काळात जवळपास हजार कोटींचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. आता हे उद्योग सुमारे 50 टक्के क्षमतेने सुरू झाले असले, तरी बाजारपेठ बंद असल्याने तयार उत्पादनाला मागणी नाही, असली तरी अत्यल्प आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे. 
जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यात दालमिल, ऑइल इंडस्ट्री आणि जीनिंग- प्रेसिंगचा समावेश होतो. डाळी व खाद्यतेल जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये येत असल्याने येथील "एमआयडीसी'तील दालमिल, ऑइल इंडस्ट्रीज "लॉकडाउन'च्या काळातही सुरू होत्या. मात्र, महत्त्वाचा औद्योगिक वाटा असलेला पीव्हीसी पाइप व ठिबक उत्पादकांसह चटई उद्योग पूर्णपणे बंद होता. 

प्लॅस्टिक उद्योग अडचणीत 
या उद्योगांसोबतच जळगावचे उद्योग क्षेत्र प्लॅस्टिक उद्योगांवर अवलंबून आहे. औद्योगिक विकासाचा सुमारे 40 टक्के वाटा या उद्योग क्षेत्राचा आहे. प्लॅस्टिक उद्योगात पीव्हीसी पाइप व ठिबकच्या नळ्यांचे उत्पादन घेणारे प्रकल्प व चटई उत्पादन, असे दोन उद्योग समाविष्ट आहेत. पैकी पीव्हीसी पाइप व ठिबक उत्पादन करणारे लघु व मध्यम असे 250 युनिटस्‌ आहेत. "जैन इरिगेशन' व "सुप्रीम'सारखे मोठे युनिटस्‌ असून, त्यांचे उत्पादन या लहान- मोठ्या सर्व युनिटस्‌ मिळून होणाऱ्या उत्पादनापेक्षा कितीतरी अधिक आहे. पीव्हीसी पाइप व ठिबकचे प्रकल्पही कृषी आधारित उद्योगात मोडतात; परंतु "लॉकडाउन'च्या काळात तेही बंदच होते. महिनाभर उद्योग बंद राहिल्याने या क्षेत्राला सुमारे एक हजार कोटींचा फटका बसल्याचे सांगण्यात येते. 

उद्योग सुरू, पण... 
आता 20 एप्रिलपासून हे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. "जैन इरिगेशन', "सुप्रीम' मिळून या सर्व उद्योगांमध्ये सुमारे दहा हजार कामगार काम करतात. त्यातील काही राज्यांतीलच अन्य जिल्ह्यांतील आहेत, तर काही स्थानिक आहेत. परगावचे, परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत. सध्या उद्योग सुरू झाले असले तरी कामगारांची उपस्थिती पूर्ण नाही. त्यामुळे हे सर्व उद्योग पूर्णक्षमतेने सुरू नाहीत. 

चटई उद्योग अद्याप बंदच 
जिल्ह्यात, विशेषत: शहरातील "एमआयडीसी'तच चटई उद्योगांची संख्या दीडशेवर आहे. या उद्योगांमध्ये सुमारे दीड हजार कामगार काम करतात. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने चटईला मागणीच नाही. त्यामुळे हे उद्योग पूर्णपणे बंद आहेत, ते अद्यापही सुरू झालेले नाहीत. या उद्योग क्षेत्राला 150 कोटींचा फटका बसला आहे. 
 
अशी आहेत आव्हाने 
पीव्हीसी पाइप व ठिबकच्या उत्पादनांना नेहमीच मागणी असते. हे उद्योग सुरू झाले असून, उत्पादनही घेतले जात आहे. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने किरकोळ विक्री करणारी दुकाने बंद आहेत. कृषी उत्पादनांना "लॉकडाउन'मधून वगळले असले, तरी शहरात येऊन या साहित्याची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही. कारण, "लॉकडाउन'मध्ये त्यांना पेट्रोल, डिझेलही उपलब्ध होत नाही. शहरात येण्यासही मज्जाव आहे. त्यामुळे स्वाभाविकत: पाइप, ठिबक नळ्यांची मागणी घटली आहे. अशा स्थितीत त्यांचे उत्पादन करून काय करणार, असा प्रश्‍न उद्योजकांसमोर आहे. 
 
खरीप हंगाम तोंडावर 
आता खरीप हंगाम तोंडावर आहे. "लॉकडाउन'मुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला पडला. अनेक शेतकरी थकबाकीदार असल्याने पीककर्ज मिळणार नाही. गेल्या पावसाळ्यात हाती आलेला घास पाण्यात गेला. "लॉकडाउन'मुळे भाजीपाला, फळे कवडीमोल झाले. हाती पैसा नाही, अशा स्थितीत शेतकरी कृषी साहित्य कसा घेईल? काहीतरी जमवून खरेदी करायचे ठरवले, तरी "लॉकडाउन' तीन मेनंतर वाढले तर शहरात कसा येणार, असे प्रश्‍न आहेत. त्यामुळे ठिबक, पीव्हीसी पाइप उद्योगाला रुळावर यायला आणखी काही महिने लागतील, असे दिसते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown plastic udyoge one thouusand loss