संकट मोठे असले, तरी न खचता त्यात संधी समजावी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. रोज कामाला जाणारे लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून घरात बसून आहेत. काहीही काम नसल्याने दिवसभर काय करायचे हा मोठा प्रश्‍न आहे. मोबाईल, टीव्ही पाहिले तर केवळ कोरोनाच्या बातम्यांचा भडिमार; यामुळे काय करायचे? या विचारातून अस्वस्थ होत आहेत. 

जळगाव : कोरोना व्हायरसच्या प्रभावाने संपूर्ण जगाला थांबविले आहे. न भूतो न भविष्य..अशी परिस्थिती कोरोना व्हायरसमुळे निर्माण झाली असून, देशात पंधरा दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. या काळात हाताला काम नाही. तर काही जणांचे वर्क फॉर होम सुरू आहे. एकंदरीत सर्वजण घरीच थांबलेले आहेत. याचा परिणाम काही व्यक्‍तींवर जाणवत असल्याने मन अस्वस्थ होण्याची भावना आहे. परंतु, लॉकडाउनचा काळ म्हणजे एक प्रकारे अकाली मिळालेली निवृत्ती असून, ती एक संकटातील संधी असल्याचे प्रत्येकाने समजायला हवे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी यात न खचता त्यातून एक संधी समजण्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. 

कोरोना व्हायरस आटोक्‍यात येत नसल्याने यावर पर्याय म्हणून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. भारतात देखील 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला असून, यातील पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. रोज कामाला जाणारे लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून घरात बसून आहेत. काहीही काम नसल्याने दिवसभर काय करायचे हा मोठा प्रश्‍न आहे. मोबाईल, टीव्ही पाहिले तर केवळ कोरोनाच्या बातम्यांचा भडिमार; यामुळे काय करायचे? या विचारातून अस्वस्थ होत आहेत. 

अकाली निवृत्तीची जुळविणे कठीण 
डॉ. नीरज देव (मानसोपचार तज्ज्ञ) ः कोणत्याही प्रकारची साथ आली तर मनावर आघात होतोच. पण कोरोनाचा आघात हा वेगळा असून त्याचा परिणाम थेट सामाजिक संबंधावर होत आहे. मनुष्य हा समाजशिल प्राणी असल्याने त्याचा परिणाम लवकर होत आहे. घरात बसून एकच विचारातून चिंता उत्पन्न होते. यात आपण फसणार तर नाही, याची भीती निर्माण होते. तसेच लॉकडाउनमुळे सक्‍तीने घरी थांबावे लागत आहे. एकप्रकारे ही अकाली निवृत्तीचा काळ आल्याने यात कसे जुळवून घ्यायचे हेच समजत नाही. सकारात्मकतेने बघायला हवे. घरात सगळ्यांशी एक भावनिक नाते पक्‍के कसे करता येईल यावर विचार करायला हवा. 

संकटातील संधी 
डॉ. एस. जी. अकोले (मानसोपचार तज्ज्ञ) ः कोरोना व्हायरसबाबत माहिती सातत्याने कानावर येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यामुळे अतिकाळजी घेतली जात आहे. काहीजण डिप्रेशनमध्ये जात आहेत. शिवाय, घरात कायम राहत असल्याने आंतरजातीय संबंध खराब होत असून भांडण वाढले आहेत. परंतु घाबरून न जाता लोकांनी आपल्यासमोर कोरोनाच्या आलेल्या संकटाला संधी समजायला हवे. कारण कुटुंबाला वेळ देता येत आहे. कोणताही अनावश्‍यक खर्च होत नाही. शिवाय भविष्यात काय करायचे यावर एकत्र बसून चर्चा करता येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lockdown Time Psychotherapy Specialists' Opinion, Opportunity for Emotional Relationships