"लॉकडाउन' 15 एप्रिलपर्यंत कायम राहणार ः जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

जळगाव शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपनी, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

 जळगाव : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. सोबतच राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाउनचे आदेश होते. त्यात आता "लॉकडाउन', 'सीमा बंदी', "शेत जमीन, प्लॉट खरेदी विक्रीचे बंदचे आदेश 15 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचे सुधारित आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. 

शासनाने 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात बंदी लागू केली आहे. सर्व नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोरोना या विषाणूंचे संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आहेत. 

खरेदी, विक्री बंद 
नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी 14 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी आज पुन्हा काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. 

कंपन्याही बंद राहणार 
जळगाव शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपनी, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यात सुधारणा करून आता 14 एप्रिलपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून अत्यावश्‍यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळण्यात आल्या आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lockdown will continue until April 15: Collector To cover order