मालवाहतुकीचा फटका शंभर कोटींचा !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

गेल्या 24 दिवसांपासूनच्या "लॉकडाउन'मुळे या सर्व ट्रकची चाके जाम झाल्याने सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. आता सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करताना जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य मालवाहतुकीसही सशर्त परवानगी दिली असली, तरी असंख्य चालक, क्‍लीनर त्यांच्या गावी गेल्याने ते ट्रकपर्यंत पोचण्याची अडचण आहे

जळगाव : शहरासह जिल्ह्यात तीनशे ते चारशे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक असून, तीन हजारांपेक्षा अधिक ट्रकचे जिल्ह्यांतर्गत, जिल्ह्याबाहेर ये-जा होत असते. मात्र, गेल्या 24 दिवसांपासूनच्या "लॉकडाउन'मुळे या सर्व ट्रकची चाके जाम झाल्याने सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. आता सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करताना जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य मालवाहतुकीसही सशर्त परवानगी दिली असली, तरी असंख्य चालक, क्‍लीनर त्यांच्या गावी गेल्याने ते ट्रकपर्यंत पोचण्याची अडचण आहे. त्यांना मूळ व्यवसायापर्यंत पोचण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

जळगाव शहर व जिल्ह्यात ट्रान्स्पोर्ट एजन्सी, व्यक्तिगत ट्रकचे मालक असे या व्यवसायात सुमारे चारशे ते पाचशे व्यावसायिक गुंतले आहेत. जिल्ह्यांतर्गत प्रत्येक ट्रकच्या दोन-तीन फेऱ्या होतात. जिल्ह्याबाहेरही अनेक फेऱ्या होतात. आंतरराज्य वाहतूक करणारे ट्रक जळगावातून मोठ्या प्रमाणात जातात. केवळ ट्रान्स्पोर्ट एजन्सीचे संचालकच नाहीत, तर चालक, क्‍लीनर आणि माल उचलणारे हमाल, असे सुमारे दहा हजारांवर लोक अवलंबून आहेत. त्या सर्वांची या "लॉकडाउन'मुळे मोठी अडचण झाली. 

वाहतूक सुरू, अडचणी कायम 
पप्पू बग्गा (अध्यक्ष, जळगाव ट्रान्स्पोर्ट संघटना) ः "लॉकडाउन'च्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू असली, तरी ती अत्यल्प, मर्यादित होती. आता अन्य मालवाहतूकही सुरू करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. परंतु या बंद वाहतुकीमुळे ट्रकचालक, क्‍लीनर त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यांची परत येण्याची कुठलीही व्यवस्था नाही. कारण, प्रवासी वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. काही ठिकाणी तर ट्रक मध्येच थांबल्या आहेत. अनेक दिवसांपासून तो माल पडून आहे. त्यापैकी बराच माल खराबही झाला असेल. त्यामुळे मालवाहतूक सुरू करताना आता या चालक, क्‍लीनरची ट्रकपर्यंत पोचण्याची व्यवस्था झाली पाहिजे. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून किमान पंधरा दिवस लागतील. 
 

मार्गदर्शक सूचना यंत्रणेपर्यंत पोचाव्यात 
दिलीप चोपडा (संचालक, अरिहंत रोडवेज, जळगाव) : जळगाव जिल्ह्यात ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक बऱ्यापैकी आहेत. व्यक्तिगत ट्रकचालक, मालकही या व्यवसायात आहेत. "लॉकडाउन'मुळे या संपूर्ण व्यवसायासमोर मोठी अडचण निर्माण झाली. जे लांब पल्ल्याचे ट्रक निघालेले होते, ते जागीच थांबले. त्यातून चालक, क्‍लीनरचे मोठे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. आता सर्व प्रकारची वाहतूक सुरू होत आहे. त्यासंबंधी मालवाहतुकीबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचना अद्याप संबंधित यंत्रणेपर्यंत पोचलेल्या नाहीत. सूचना यंत्रणेपर्यंत पोचल्यास वाहतुकीत आज ज्या अडचणी आल्या, त्या पुढे येणार नाहीत.  

वाहतूक तातडीने सुरळीत व्हावी 
महेश पाटील (व्यवस्थापक, बल ट्रान्स्पोर्ट, भुसावळ) : शहरात आठ- दहा ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आहेत. मात्र, "लॉकडाउन'मुळे केवळ धान्य, भाजीपाला आदी अत्यावश्‍यक मालाची वाहतूक वगळता इतर सर्व मालवाहतूक बंद असल्यामुळे लाखोंचे नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात तीस ते पस्तीस लाखांचे आमचे एकट्याचे नुकसान झाले आहे. मार्च ते जून हा कालावधी ट्रान्स्पोर्ट व्यवसायासाठी महत्त्वाचा मानला जातो. वाहनचालक, क्‍लीनर, हमाल आदी 70 ते 80 कामगार घरी बसून आहेत. तरीदेखील त्यांना पगार द्यावा लागतो. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक अगोदरच कर्जबाजारी आहेत. या "लॉकडाउन'मुळे सर्व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक पाच वर्षे मागे गेले आहेत. वाहनांचे कर्ज कसे फेडावे, याचे संकट उभे राहिले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य मालाचीही वाहतूक काही नियम, अटी-शर्ती घालून सुरू ठेवण्यास मुभा मिळाली पाहिजे. या एकट्या व्यवसायावर असंख्य घटक अवलंबून आहेत. 

बिनशर्त परवानगी द्या 
सुभाष चौधरी (संचालक, मामाजी ट्रान्स्पोर्ट, अमळनेर) : "लॉकडाउन'मुळे फक्‍त अत्यावश्‍यक सेवाच सुरू आहेत. मात्र, तरीही मालवाहतूक करणारी वाहने अडचणी येत असल्याने बंद आहेत. ट्रक देशाच्या कानाकोपऱ्यांत चोवीस तासांत मालपुरवठा करतात. एका मालवाहतुकीत सुमारे शंभर जणांचे अर्थचक्र होत असते. मात्र, वाहन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी मालवाहतुकीस शासनाने बिनशर्त परवानगी देणे गरजेचे आहे. मालवाहतूक सुरळीत झाल्यास काळाबाजारही थांबण्यास मदत होणार आहे. याकडे शासनाने लक्ष दिल्यास अनेक कुटुंबांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. ट्रान्स्पोर्ट व्यवसाय हा देशाचा मजबूत कणा आहे. त्यांना परवानगी मिळणे गरजेचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lokdown One hundred crore loss of transport