पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; केवळ अधिकाऱ्यांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

गर्दी न करता मोजक्‍याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण समारंभाला परवानगी नाकारण्यात आली होती.

जळगाव ः महाराष्ट्र दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आठला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारोह फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. 

महाराष्ट्र दिन आज अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ध्वजारोहण कार्यक्रमास देखील जास्त गर्दी न करता मोजक्‍याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण समारंभाला परवानगी नाकारण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे आदी उपस्थित होते. 

प्रशासनाला सहकार्याचे आवाहन 
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्‍चित जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

समारंभास प्रथमच कर्मचारी नाही 
राष्ट्रीय कार्यक्रम असल्यास शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असते. परंतु कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्र दिनाच्या समारंभास शासकिय कर्मचाऱ्यांना देखील उपस्थित न राहण्याचे सांगण्यात आले होते. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. तर शाळा, महाविद्यालयात देखील मोजक्‍याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon maharashtra din Flag hoisting gulabrao patil