कॉंग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन खडसेंचे काय?   

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे. 

जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे. 

राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, तर कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मंत्रिपदही दिले जाण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष व शिवसेना आपापल्या कोट्यातून हे मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे भाजप पुनर्वसन करीत आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याचे दिसत नाही. भोसरी जमीन खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरण, दाऊद इब्राहिम यांच्या पत्नीशी फोनवरून कथित संभाषण असे त्यांच्यावर आरोप होते. या प्रकरणी बराच वाद झाल्यानंतर चौकशीसाठी त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. आता या प्रकरणाची चौकशी होऊन आपण निर्दोष असल्याचा दावा स्वतः; खडसे यांनीच केला आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार काय? हाच खरा आता प्रश्‍न आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या खासदार आहेत. खडसेंनी पक्षनेतृत्वावर उघडपणे आरोप केले होते. त्यामुळे रक्षा खडसे यांना रावेर मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी पक्ष देणार की नाही? याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर तर केलीच परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचारासाठीही आले होते. त्या विजयी होण्याचा विश्‍वासही व्यक्त होत आहे. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देवून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत असेल तर मग भाजपचेच एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत पक्षाची भूमिका काय असणार ? याकडेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या कार्यकर्त्यासह जिल्ह्यातील नागरिकांचेही लक्ष आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mantrimandal vistar khadse