बेवारस, बेघर, निराधारांसाठी मंगल कार्यालये, मॅरेज हॉल खुले होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

बेवारस, बेघर, निराधारांना राहण्याची गैरसोय झाली आहे. अनेकांना भोजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आज बेवारस, बेघर, निराधारांना राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मॅरेज हॉल, मंगल कार्यालये अधिग्रहीत करण्याचे आदेश सर्व प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जळगाव ः जिल्ह्यात संचारबंदीमुळे बेवारस, बेघर, निराधार यांच्या राहण्याची गैरसोय झाली आहे. त्यांना निवारा मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, मॅरेज हॉल्स अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत. यामुळे बेघरांच्या निवाराची सोय होणार आहे. 

जिल्ह्यात कोरोनोचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बेवारस, बेघर, निराधारांना राहण्याची गैरसोय झाली आहे. अनेकांना भोजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आज बेवारस, बेघर, निराधारांना राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मॅरेज हॉल, मंगल कार्यालये अधिग्रहीत करण्याचे आदेश सर्व प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिग्रहीत केल्यानंतर बेघर, बेवारस, निराधारांना तेथे निवासाची सोय करून द्यावी. शिवभोजन केंद्रातर्फे त्यांना अन्न पॅकिंग करून द्यावे, समाजसेवी संस्थांनीही बेघरांच्या अन्नाची सोय करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

या आदेशाची प्रत आवश्‍यक त्या कार्यवाहीसाठी व माहितीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, शासकीय वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व पालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, एस..टी.विभागांना पाठविण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Marriage halls will be open for the homeless, homeless, destitute