esakal | घरांच्या भिंतीवरील मीटर निघणार;  वीजचोरी रोखण्यासाठी चौकात सिलबंद पेटी 
sakal

बोलून बातमी शोधा

meter-box

मीटरमधील होणारी फेरफार रोखण्यासाठी बारा घरांचे मीटर एका पेटीत बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात शहरातील तीन भागांत काम करण्यात येत आहे. 
संजय तडवी, कार्यकारी अभियंता, जळगाव शहर महावितरण

घरांच्या भिंतीवरील मीटर निघणार;  वीजचोरी रोखण्यासाठी चौकात सिलबंद पेटी 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव ः घराच्या बाहेर बसलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली जाते. अशी छुप्या पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी "महावितरण'कडून एक नवीन मोहीम आणली आहे. घराच्या भिंतीवर बसविण्यात आलेले मीटर काढून ते चौकातील खांबावर मोठ्या पेटीत "सील'बंद करण्यात येत आहेत. 

"महावितरण'कडून करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी प्रतियुनिट विजेचे दर अधिक आहे. यामुळे दर महिन्याला येणाऱ्या बिलाचा आकडा मोठा असतो. यातून सुटका होण्यासाठी मीटरमध्ये फेरफार करून चुंबक किंवा रिमोटच्या सहाय्याने मीटर बंद करून वीजचोरी केली जाते. शिवाय, काही ठिकाणी थेट आकडे टाकून वीजचोरी केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी "महावितरण'ने यापूर्वी इन्सुलेटेड केबल टाकण्याचे काम केले आहे. यामुळे काहीअंशी वीजचोरीला आळा बसला असला, तरी मीटरमधील फेरफार थांबलेली नाही. ही फेरफार रोखण्यासाठी घरावरचे मीटर काढून चौकात बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

बारा घरांचे मीटर एकाच ठिकाणी 
मीटरमधील फेरफार रोखण्यासाठी घराच्या भिंतीवर असलेले मीटर काढून कॉलनीतील चौक किंवा रस्त्यावरील वीज खांबावर मोठ्या पेटीत मीटर लावण्यात येणार आहे. मोठ्या आकाराच्या या पेटीत बारा घरांचे मीटर लावून पेटी सील बंद केली जाणार आहे. पेटीला पारदर्शी दरवाजा असल्याने मीटर रीडिंग घेणे देखील सोयीचे ठरणार आहे. या ठिकाणाहून सर्व्हिस वायरद्वारे वीजपुरवठा घरात जोडण्यात येणार आहे. 

जळगावात तीन परिसरात काम 
"महावितरण'कडून सदरचे काम हे वीज चोरी होत असलेल्या भागात टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला शहरात सुरवात करण्यात आली असून, शहरातील हरिविठ्ठलनगर, मेहरूण आणि जैनाबाद परिसरात चौकात "सील'बंद पेटीत मीटर बसविण्यात येणार आहेत. हरिविठ्ठलनगर परिसरात हे काम सुरू आहे. 

भुसावळ, जळगावमध्ये प्रयोग 
पेट्यांमध्ये मीटर बसविण्याचा प्रयोग "महावितरण'कडून संपूर्ण जिल्ह्यात अर्थात ज्या भागात जास्त वीज चोरीचे प्रमाण आहे; अशा भागात राबविण्यात येणार आहे. यात सुरवातीला जळगाव आणि भुसावळ शहरातील विशिष्ट भागांमध्ये या पेट्या बसविण्यात येणार असून, भुसावळ शहरातील नियोजन अद्याप झालेले नाही. तर जळगाव शहरात याची सुरवात करण्यात आली आहे. 
 

loading image