"कोरोना'वरील उपाययोजनांसाठी निधी देण्यात सहा आमदारांसह मंत्री पुढे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

निधी दिलेल्या आमदारांनी त्यांच्या तालुक्‍यातील रुग्णालयातील डॉक्‍टरांना बोलावून "कोरोना' रुग्णांसाठी ज्या सुविधा, औषधी हव्यात त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

जळगाव :  राज्य शासनाने "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून पन्नास लाखांची मदत मतदारसंघात करावी, असे सांगितले आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील 11 पैकी पालकमंत्र्यांसह 7 आमदारांनीच हा निधी दिला असून, चार आमदारांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

आमदारांनी दिलेल्या निधीतून त्या-त्या मतदारसंघात मागणीनुसार इन्फ्रारेड थर्मामीटर, पीपीई किट, कोरोनो टेस्टिंग किट, एन-95 मास्क, ट्रिपल लेयर मास्क, रबर ग्लोवज नंबर 7, रबर ग्लोवज नंबर 7.5, सॅनिटायझर, आयसोलेशन वार्ड कॉट पिलो बेडशिट बल्केट, ओ टू सिलिंडर किट, 3 लियर मास्क (सर्जिकल), डेटॉल, बायोमेडिकल वेस्ट, औषधी, आय.व्ही.स्टॅंड आदी वस्तूंचा समावेश आहे. 

निधी दिलेल्या आमदारांनी त्यांच्या तालुक्‍यातील रुग्णालयातील डॉक्‍टरांना बोलावून "कोरोना' रुग्णांसाठी 
ज्या सुविधा, औषधी हव्यात त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून रुग्ण दाखल होताच त्यावर उपचार करून तो बरा झाला पाहिजे. सोबतच जिल्हा नियोजन समितीतर्फेही तालुकावार कोविड सेंटरसाठी निधी देण्यात आला आहे. 

निधी देणारे आमदार (कंसात निधी) 
पालकमंत्री गुलाबराव पाटील (30 लाख), अनिल भाईदास पाटील (41.46 लाख), किशोर पाटील (49.18 लाख), संजय सावकारे (49.54 लाख), चंद्रकांत पाटील (34.92 लाख), शिरीष मधुकरराव चौधरी (40.94 लाख), सुरेश भोळे (49.86 लाख). 

निधी न देणारे आमदार 
गिरीश महाजन, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, लता सोनवणे. 

मंत्री पाटील, पटेल, वाघांकडून रुग्णवाहिकेस निधी 
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात व धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी आधुनिक रग्णवाहिका, शववाहिकेसाठी 30 लाखांचा निधी प्रस्तावित केला असून, आमदार चंदुलाल पटेल यांनी 49 लाख 99 हजार, स्मिता वाघ यांनी 20 लाखांचा निधी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The minister, along with six MLAs, went ahead to fund the measures on Corona