"खाकी'ने दिला माय-लेकींना मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

नंदुरबार तालुक्‍यातील आदिवासी पाड्यावर वास्तव्यास असलेल्या मोगरा राजा तडवी त्यांच्या दोन तरुण मुलींसह शहरातील रामेश्‍वर कॉलनीत भाड्याने घर घेऊन वास्तव्यास होत्या. मात्र, लॉकडाउनच्या स्थितीमुळे दोघा मुलींचे प्रशिक्षणही थांबले असून, घरभाडे देण्यासही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

जळगाव : नंदुरबार तालुक्‍यातील दोन विद्यार्थिनी शासकीय योजनेंतर्गत संगणक क्‍लाससाठी जळगावात आईसह खोली करून वास्तव्यास होत्या. मात्र, "लॉकडाउन'मुळे त्याचे प्रशिक्षणही बंद असून घरभाड्यासाठी पैसे नसल्याने मालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. परिणामी, या विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी पासेस मिळाव्या म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. या विद्यार्थिनींना निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी एक महिन्याचा किराणा आणि घरभाडे देऊन जळगावातच थांबण्यास सांगितले. 

देशभरातील "लॉकडाउन'च्या स्थितीमुळे कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे. कामाचे शिक्षणाचे ठिकाणे सोडून मूळ गावाकडे परतण्यामुळे यंत्रणेवर अधिकचा ताण पडत असून, कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोकाही वाढला आहे. परिणामी, शासनाच्या वतीने स्थलांतर थांबविण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रशासनाला तसे आदेशही देण्यात आले आहेत. नंदुरबार तालुक्‍यातील आदिवासी पाड्यावर वास्तव्यास असलेल्या मोगरा राजा तडवी त्यांच्या दोन तरुण मुलींसह शहरातील रामेश्‍वर कॉलनीत भाड्याने घर घेऊन वास्तव्यास होत्या. मात्र, लॉकडाउनच्या स्थितीमुळे दोघा मुलींचे प्रशिक्षणही थांबले असून, घरभाडे देण्यासही त्यांच्याकडे पैसे नव्हते. परिणामी, गावी जाण्याचे पासेस बनविण्यासाठी त्या आज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी त्यांना जाता येणार नाही. असे, सांगितल्यावर तिघांनाही रडू कोसळले. अखेर निरीक्षक शिरसाठ यांनी त्यांना एक महिन्याचा किराणा आणि घरभाड्याचे रोख पैसे देऊन जळगावातच थांबण्यास सांगितल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. कायद्याचे पालन करताना सामाजिक बांधिलकी म्हणून शिरसाठ यांच्या कर्तव्यदक्षतेने तिन्ही मायलेकींचे डोळे पाणावले. त्यांनी हात जोडून आभार व्यक्त करत आनंदाने घरचा रस्ता धरला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mother and girl by help jalgaon police