लेकराची ओढ रहावेना...मग काय...माऊली निघाली शेगावला अनवाणी ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

उपाशी पोटीच पायपीट करीत निघाल्या असताना त्यांना ईच्छादेवी चौका जवळ अस्वस्थ वाटू लागल्याने त्या मदतीसाठी तांबापुराच्या दिशेने निघाल्या मात्र श्‍यामा फायर जवळच चक्कर येऊन कोसळल्या.

जळगाव  :आई...आईच असते तिची तुलनाच होऊ शकत नाही. झालीच तर देवाशी होते. अशी ही आई गेली दहा दिवस लॉकडाऊन मध्ये अडकून पडली होती. लेकरांच्या विरहाने व्याकुळ होऊन पायीच एरंडोल ते शेगाव निघाली असताना चक्कर येऊन कोसळली. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. खर्चासाठी पैसे, आणि फळाहार देत माणुसकी जोपासली. 

तांडी(ता.शेगाव जि.बुलढाणा) येथील हिरा रमेश वाघोले(वय-30) यांचे वडील आजारी असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी ती, जळगावी आली होती. वडिलांची व नातेवाइकांची भेट घेऊन निघण्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊनची घोषणा होऊन संचारबंदी लागू झाली. गेल्या दहा दिवसांपासून हिरा वाघोले या आपल्या पाच आपत्त्या पासुन दूर असल्याने व्याकूळ होऊन त्यांनी पायीच एरंडोल ते शेगाव प्रवासाला सुरवात केली..उपाशी पोटीच पायपीट करीत निघाल्या असताना त्यांना ईच्छादेवी चौका जवळ अस्वस्थ वाटू लागल्याने त्या मदतीसाठी तांबापुराच्या दिशेने निघाल्या मात्र श्‍यामा फायर जवळच चक्कर येऊन कोसळल्या. बेशुद्धावस्थेत महिला पडल्याची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, महिला पोलिस सपना येरगुंटला, विजय बाविस्कर अशांनी धाव घेत तीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेचे पती रमेश मनशी वाघोले यांना माहिती दिली आहे. 

पोलिसांचा मदतीचा हात 
बेशुद्धावस्थेत पडलेल्या हिरा वाघोले यांना पोलिसांनी उचलून दवाखान्यात दाखल केले, तत्पुर्वी तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली. तांडी(ता.शेगाव) येथे हातावर पोट असणाऱ्या कुटूंबातील हिराबाई यांना लक्ष्मी, उमेश, रोहित, गोविंद, आणि सर्वांत लहान दोन वर्षीय नीलेश असे पाच अपत्ये असून गेल्या दहा दिवसांपासून मुलांची खूपच आठवण येत असल्याने आपण पायीच निघण्याचे निर्णय घेतल्याचे तिने सांगताच पोलिसही अवाक्‌ झाले. पेण्यासाठी पाणी, खायला फळं आणि खर्चाला पैसे देत हिराबाईला दवाखान्यात दाखल केले असून उपचार सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mother Miss you very much childran goes barefoot due to lacquer!