ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणेमुळेच जळगावमध्ये रुग्णसंख्या वाढली : खासदार उन्मेष पाटील  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

जिल्ह्यात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णसंख्या आता 193 झाली आहे; तर तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जळगावचा मृत्युदर अधिक आहे, तसेच "पॉझिटिव्ह' रुग्णसंख्या वाढीचा दरही अधिक आहे. त्यामुळे जिल्हा "हॉटस्पॉट' होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव  : "कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काळजी घेण्याची गरज होती. मात्र, तीच ढेपाळल्यामुळे जळगावात रुग्णसंख्या वाढली, तसेच मृत्युदरही वाढला, असा आरोप भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. 

जिल्ह्यात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णसंख्या आता 193 झाली आहे; तर तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जळगावचा मृत्युदर अधिक आहे, तसेच "पॉझिटिव्ह' रुग्णसंख्या वाढीचा दरही अधिक आहे. त्यामुळे जिल्हा "हॉटस्पॉट' होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत खासदार पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. "कोरोना' रुग्णांच्या बाबतीत जी काळजी घ्यावयाची होती, ती या यंत्रणेनेही घेतलेली नाही. रुग्णांची अहवेलना त्यांनी केली. त्यामुळे रुग्णांनी अक्षरश: रुग्णालयातून पळ काढला. जळगाव येथे तर रुग्णांना जेवणही देण्यात आले नाही. रुग्णांना व्यवस्थित उपचार न मिळाल्यानेच काही जणांचा मृत्यू झाला. ही बाब अतिशय गंभीर आहे. जळगाव आरोग्य समितीच्या बैठकीत राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनीच आरोग्य यंत्रणेत ढिसाळपणा असल्याचा आरोप केला होता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्यात असलेल्या वादाची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. जर रुग्णावर उपचार करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच असे वाद असतील, तर तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची अवस्था काय असेल? याचा विचार न केलेलाच बरा. 
 
कागदावर "डॉक्‍टर', पण... 
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थितीबाबत खासदार पाटील म्हणाले, की जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्‍टरांची संख्या कागदावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे; परंतु ज्यावेळी आरोग्य समितीच्या सभेत माहिती घेतली असता, प्रत्यक्षात सातच डॉक्‍टर कार्यरत असल्याचे आढळून आले. ही अत्यंत चुकीची बाब आहे. 
 
राज्याच्या आरोग्य विभागाने दखल घ्यावी 
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारही वेळेवर मिळत नाही. आता राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने त्याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्‍टरांची संख्या कमी असल्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी आपली सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना निश्‍चित होणार आहे. मात्र, आतातरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याची गरज आहे. त्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनीही त्याबाबत लक्ष देऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mp unmesh patil health department not serias corona virus