Loksabha 2019 : शिवसेनेला सत्तेत खरंच मिळणार वाटा?

Loksabha 2019 : शिवसेनेला सत्तेत खरंच मिळणार वाटा?

जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर विरोधी पक्ष असलेला शिवसेना सत्तेत आल्यानंतर महापालिकेतील चित्र बदलणार काय? याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. 
महापालिकेची निवडणूक वर्षभरापूर्वी झाली. भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले. शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली असलेली महापालिकेतील गेल्या 25 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणल्याचा दावा करीत भाजपने तब्बल 57 नगरसेवकांच्या यशाच्या बळावर सत्तेचा झेंडा फडकविला. शिवसेनेला फक्त 15 जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. 
महापालिकेत आजही भाजपची सत्ता असली, तरी विरोधी पक्ष शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना आणि त्यांच्या नेत्यांनाही महापालिकेतील कारभाराची माहिती आहे. केवळ पंधरा सदस्यांच्या बळावर शिवसेना भाजपला वरचढ ठरत असून, भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी अद्याप कारभाराबाबत चाचपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय, राजकीय चित्र पाहिल्यास ज्यांच्या नेतृत्वाखाली भाजप महापालिकेत सत्तेत आले, ते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात असूनही शिवसेनेला महापालिकेत फारसा फरक पडलेला नाही. मात्र, आता लोकसभेनंतर भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
महापालिकेत 15 सदस्य असलेल्या शिवसेनेला भाजप कोणती पदे देणार? याचीच आता उत्सुकता आहे. उपमहापौर आणि महिला- बालकल्याण समितीचे सभापतिपद देण्याची शक्‍यता आहे; परंतु या पदामुळे सत्तेत कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे शिवसेना स्थायी समिती सभापती हे एकच पदही मागण्याची शक्‍यता आहे. 
 
विरोधक नाहीच 
शिवसेनेने महापालिकेच्या सत्तेत सहभाग घेतला, तर विरोध फारसा राहणार नाही. पक्षीय बलाबलनुसार भाजपचे 57, शिवसेनेचे 15 आणि "एमआयएम'चे तीन सदस्य आहेत. भाजप- शिवसेना दोन्ही पक्ष सत्तेत गेल्यास केवळ तीन सदस्य असलेला "एमआयएम' हा एकमेव विरोधी पक्ष महापालिकेत असणार आहे. 
 
शिवसेना नेत्यांसह मैदानात 
भाजप- शिवसेनेची वरिष्ठ स्तरावर युती झाली, तरीही जळगावात मात्र शिवसेना नाराज होती. सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषदेतही युती करून सत्तेचा वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व मंत्री महाजन यांची संयुक्त बैठक झाली. त्यांनी दोन्हींकडे सत्तेचा वाटा देण्याची सध्यातरी "हमी' दिली आहे. त्यामुळे जळगाव शहरात शिवसेनेच्या नेत्यांसह नगरसेवकही प्रचारासाठी मैदानात दिसत आहेत. मात्र, निवडणुकीनंतर भाजपने सत्तेचा वाटा न दिल्यास हे चित्र कायम राहणार काय? याची प्रतीक्षा जळगावकरांनाही असणार आहे. 
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com