जळगाव शहराला "कोरोना'चा वेढा..."मनपा'ची यंत्रणा कुचकामी  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

महापालिकेकडून संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असून, ज्या परिसरात रुग्ण आढळला आहे.

जळगाव  : जिल्ह्यासह शहरात देखील "कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रोज नवनवीन भागात "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून येत आहेत. आज शहरातील अक्‍सानगर व गोपाळपुरा परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता शहराला "कोरोना'चा वेढा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

जिल्ह्यात "कोरोना'ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात "कोरोना'चे नवे 25 रुग्ण आढळून आले. यात मेहरुण परिसरातील अक्‍सानगर व गोपाळपुरा भागातील हे दोघे रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळून आले आहेत. हे दोन्ही परिसर अत्यंत दाटीवाटीचे असून, शहरातील मध्यवर्ती भागातील हे ठिकाण आहे. दररोज नवनवीन परिसरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरलेली आहे. 

गोपाळपुरा, अक्‍सानगर "सील' 
अक्‍सानगर व गोपाळपुरा परिसरात दोन "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून हे दोन्ही परिसर "सील' करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून या दोन्ही परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना देखील "क्‍वारंटाइन' करण्यात आले आहे. 

मनपाची यंत्रणा कुचकामी 
महापालिकेकडून संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असून, ज्या परिसरात रुग्ण आढळला आहे. त्याच परिसरात केवळ तपासणी करून चालढकल करीत असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना "कोरोना'ची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याची खंत एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

 
वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामाचा ताण 
शहरात दररोज "कोरोना'ग्रस्त आढळून येत असून, महापालिका आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी राम रावलाणी यांना माहिती विचारण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच वारंवार आम्हाला कामाचा ताण असून, आम्हाला आधी काम करू द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी तसेच रावलाणी यांना कामाचा अतिरिक्त ताण असल्याने त्यांच्यासोबत आणखी एका अधिकाऱ्याने नियुक्ती करण्याची आवश्‍यकता आहे. 

 
"त्या' महिलेला ट्रॅव्हल हिस्ट्री नाही 

अक्‍सानगरातील 55 वर्षीय महिला देखील पॉझिटिव्ह आली असून, या महिलेला कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. या महिलेला देखील काही दिवसांपासून "कोरोना'सदृश लक्षणे जाणवत होती. दरम्यान, या महिलेला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज या महिलेचा अहवाल देखील "पॉझिटिव्ह' प्राप्त झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon municipal system ineffective corona paitiont number increasing