नाशिकहून रात्री आला; चिठ्ठीवर आई- वडीलांचा नंबर लिहून केले असे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आत्महत्येपूर्वी त्याच्या स्कुटीच्या डिक्कीत त्याच्या आई- वडीलांचा मोबाईल नंबर लिहून ठेवला होता. नाशिकच्या युवकाने चिंचोली शिवारातील विहिरीत आत्महत्या केल्याने त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

जळगाव : नाशिक येथील श्रमिकनगरातील 21 वर्षीय रितेश राजेंद्र लाडवंजारी या युवकाने तालुक्‍यातील चिंचोली शिवारातील मावसभावाच्या शेतातील विहरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. युवकाने आत्महत्येपूर्वी आपल्या हाताची नस कापली व त्यानंतर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नाशिक शहरातील श्रमिक नगरातील रहिवासी रितेश राजेंद्र वंजारी (वय 21) याची मोटारसायकल (एमएच, 15 एफजी 3093) जळगाव तालुक्‍यातील चिंचोली शिवारातील ललित भास्कर घुगे यांच्या शेतातील विहरीजवळ आढळून आली. तसेच एक चप्पल विहरीत पडलेली असल्याने याबाबतची ललित घुगे यांनी तात्काळ मुक्ताईनगर तालुक्‍यातील भिलवाडी येथील त्यांचे मामा राजेंद्र शंकर पालवे यांना दिली. दरम्यान राजेंद्र पालवे हे तात्काळ चिंचोलीला येण्यासाठी निघाले. सकाळी दहाच्या सुमारास पालवे हे चिंचोली येथे पोहचले. यावेळी त्यांनी विहरीतून काढलेला युवकाचा मृतदेह बघितला असता. तो मृतदेह त्यांचा भाचा रितेश राजेंद्र लाडवंजारी याचा असल्याचे त्यांनी ओळखले. याप्रकरणी राजेंद्र शंकर पालवे यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न 
मृत रितेश लाडवंजारी हा गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक येथून मोटारसायकलीने चिंचोली येण्यासाठी निघाला होता. त्यानंतर सकाळी पवणेसातच्या सुमारास रितेश याचा मृतदेह विहरीत मिळून आला. रितेश याने आपल्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून विहरीजवळ रक्त लागलेला चाकू मिळून आला असल्याने त्याच्यासोबत घातपात झाल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. 

आत्महत्येपूर्वी लिहिला आई- वडीलांचा नंबर 
मृत रितेश याने आत्महत्येपूर्वी त्याच्या स्कुटीच्या डिक्कीत त्याच्या आई- वडीलांचा मोबाईल नंबर लिहून ठेवला होता. नाशिकच्या युवकाने चिंचोली शिवारातील विहिरीत आत्महत्या केल्याने त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता तो घातपात नसून त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

डिवायएसपींची घटनास्थळी धाव 
नाशिकच्या युवकाने जळगावात आत्महत्या केल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन, पोलिस अधिक्षक विनायक लोकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप हजारे, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौक, भुषण सोनार यांनी पोलिस पाटील मुकेश पोळ यांच्यासाह नागरिकांच्या मदतीने विहरीतून मृतदेह बाहेर काढला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon nashik young boy sucide well