नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

 नऊ महिन्याची गरोदर असलेली ती महिला सुरतहून पती आणि तीन वर्षाच्या मुलासह घरी जाण्यासाठी अमेठी (मध्यप्रदेश) निघाली. तीन दिवसात भर उन्हात तब्बल 341 किमीची पायपीट करत जळगावी सकाळी पोहचली. पण प्रसुतीची वेळ जवळ आल्याने रस्त्यावरच प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या; अशातच बाळ बाहेर आले होते. पण कोरोनाच्या भितीमुळे कोणी जवळ देखील येईना. पती देखील घाबरला होता. दरम्यान आरएसएसच्या कार्यकर्त्यांने महिलेला रूग्णवाहिकेत नेत प्रसुती केली. पण बाळाची नाळ तशीच असल्याने कापडात बाळाला गुंढाळले. दहा- पंधरा मिनिटांनी डॉक्‍टर आल्यानंतर त्यांनी नाळ कापली... ही सारी घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. 

जळगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कामधंद्यासाठी परराज्यांमध्ये अडकलेले कामगार आपल्या कुटूंबासह पायी आपल्या स्वगृही परतत आहे. असेच एक कुटूंब 341 किमी पायपीट करीत आपल्या मूळगावी परतत होते. परंतु त्या महिलेचा प्रसुती कळा असह्य होवू लागल्या. त्या महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतांना त्या महिलेने एक गोंडस मुलीला जन्म दिल्याचा प्रकार आज सकाळी महामार्गावर घडला. 

देशात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्रशासनाकडून गेल्या 44 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच रेल्वेसेवा, बस व खासगी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राज्यात कामधंद्यासाठी गेलेले कामगार रेल्वे ट्रॅक, सायकल यासह रस्त्यानेच पायी आपल्या घराच्या दिशेने निघाले आहे. असच उत्तर प्रदेशमधील अमेठीतील ईठागोरीगंज थाना या गावातील नूर मोहम्मद त्याची पत्नी इशरत मोहम्मद नूर व तीन वर्षाचा मुलगा मोहम्मद नुमान हे पायीच आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले होते. हा परिवार सुरत येथील लूम परिवसरात अर्थार्जनासाठी कपडे विणण्याचे काम करीत करुन आपला उदनिर्वाह करीत होता. नूर मोहम्मदची पत्नी इरशत ही 9 महिन्यांची गर्भवती असल्याने तीला आज सकाळच्या सुमारास प्रसुती कळा जाणवू लागल्या. तसेच आज सकाळच्या सुमारास अचानक त्या महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होवू लागला. 

संघाच्या कार्यकर्त्याने घेतली तात्काळ धाव 
रस्त्याने पायी आपल्या घराकडे निघालेल्या गर्भवती महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याने तीच्या पतीने शासकीय आयटीआय जवळ असलेल्या काही लोकांना याबाबतची माहिती दिली. या नागरिकांनी संघाचे कार्यकर्ते कवी कासार यांना सकाळी 6 वाजता घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता. कवी कासार यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. 

अन्‌ त्या पुरुषानेच केली महिलेची प्रसूती 
त्या महिलेला प्रसुतीच्या कळा असह्यक होत असल्याने ती महिला महामार्गाच्या बाजूला असलेल्या झोपड्यांजवळ पडलेली होती. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचताच त्या महिलेला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. परंतु तो पर्यंत त्या महिलेच्या शरीरातून अर्धे बाळ बाहेर निघालेले होते. यावेळी श्री. कासार यांनी त्या महिलेच्या शरीरातून अर्धवट आलेल्या बाळाला बाहेर काढत त्या महिलेची प्रसुती केली. 

अन्यथा त्या मातेसह बाळाचा जीव वाचला नसता 
परप्रांतीय महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर तीच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. यावेळी कवी कासार यांनी तात्काळ मातृसेवा हॉस्पीटलमध्ये नेले. याठिकाणी डॉ. विलास भोळे यांनी प्राथमिक स्तरावर त्या महिलेची व बाळाची नाळ कापले. परंतु त्या महिलेची प्रकृती बिकट होत असल्याने त्यांनी तात्काळ त्या महिलेला गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी कासार यांनी तात्काळ त्या महिलेला गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल करीत वेळीच उपचार मिळाले. अन्यथा त्या बाळाचा व त्या मातेचा जीव वाचला नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon nine month Pregnant women road Delivery