पावसाअभावी खरिपात निम्याने घट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

रावेर : तालुक्यात तब्बल वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पावसाअभावी बागायतीसह खरीप पिकांचे उत्पादन निम्याने घटणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाजार पेठेतही शुकशुकाट आहे. आवश्यक असेल तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा विधान सभेत करण्यात आली. मात्र ती देखील फोल ठरली आहे. 

रावेर : तालुक्यात तब्बल वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पावसाअभावी बागायतीसह खरीप पिकांचे उत्पादन निम्याने घटणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाजार पेठेतही शुकशुकाट आहे. आवश्यक असेल तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा विधान सभेत करण्यात आली. मात्र ती देखील फोल ठरली आहे. 

पावसाळ्याचे दोन महिने उलटले आहेत. या दोन महिन्यात केवळ बारा, तेरा दिवस पाऊस तालुक्यात पडला. मृग नक्षत्र कोरडा गेले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पाच तारखेपर्यंत एक दोनदा जोमदार व अन्य वेळी समाधान कारक, तुरळक पाऊस पडला आहे. तालुक्यात आता पर्यंत २१ टक्केच पाऊस पडला आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी खरिपाची शंभर टक्के पेरणी केली आहे. पिकांची उगवण ही छान झाली होती. आठ दिवसांपूर्वी समाधानकारक पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच कडक ऊन सावल्यांचा खेळ यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. पाऊस पाणी नसल्यामुळे पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. 

उत्पादनात मोठी घट 
खरिपाच्या पेरण्यांना तीन आठवड्याहून अधिक कालावधीचा विलंब, पेरणीनंतर पावसाने मारलेली दडी यामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट येणार आहे. यात कोरडवाहू शेतीचे ४० ते ५० टक्के तर बागायती पिकांचे वीस ते तीस टक्के नुकसान होण्याची आजची स्थिती आहे. तसेच मका, ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडी खते, फवारणी करायची की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 

कृत्रिम पावसाची घोषणा हवेत 
आमदार हरिभाऊ जावळे यांनी विधान सभेत पावसाळी अधिवेशनात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली होती. ती स्थिती आज येऊन ठेपली आहे. तसे पाहिले गेल्यास कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग मागील आठवड्यातच व्हायला हवा होता. मात्र विधानसभेतील मागणीचा लोकप्रतिनिधींकडून नंतर पाठपुरावा होताना दिसून आलेला नाही. शासनाकडून याची अंमलबजावणी केव्हा होणार याबाबत तालुक्यात चर्चा आहे. शासन आणि लोकप्रतिनिधी कशाची वाट पहात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने त्वरित कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ जन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाने दिलेली ओढ, महागडी खते, फवारणी व वाढती महागाई यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon no rain kharip hangam