Video जिल्ह्यात अवकाळी पाऊस नाही, तापमानवाढीचा मात्र धोका! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

जिल्ह्याच्या तापमानाने आज चाळिशी ओलांडून ते 41 अंशांपर्यंत पोचले आहे, असे हवामानतज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले. 
 

जळगाव : राज्यभरातील काही भागांत येत्या काही दिवसांत अवकाळी वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, हा अंदाज उत्तर महाराष्ट्रासाठी नाही. त्याउलट परिस्थिती आहे. शहरासह जिल्ह्याच्या तापमानाने आज चाळिशी ओलांडून ते 41 अंशांपर्यंत पोचले आहे, असे हवामानतज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले. 

दरम्यान, जिल्ह्यात मार्चपासूनच तापमानात वाढ होते. यंदा मात्र एप्रिलमध्ये तापमान वाढू लागले आहे. हे तापमान रोज वाढत जाऊन 22 एप्रिलपर्यंत तापमान वाढत जाईल. 45 ते 46 अंशांपर्यंत उच्चांक गाठेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ गोरे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कोरोनोचा प्रादुर्भाव न वाढण्यासाठी घरीच राहावे. लॉकडाउनच्या स्थितीत बाहेर पडू नये. उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही श्री. गोरे यांनी केले आहे. 
 
हवेतील प्रदूषण 290 वरून 45 वर 
कोरोनामुळे लॉकडाउनची स्थिती आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने वायुप्रदूषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाउनपूर्वी रस्त्यांवरील हवेतील प्रदूषणाचा स्तर 280 ते 290 अंकांपर्यंत होता. तो थेट आता 35 ते 45 अंकांपर्यंत आला आहे. असंख्य वाहनांची वर्दळ आता होत नाही. यामुळे प्रदूषण कमी झाले आहे. 
 
आरोग्यदायी जीवन! 
अतिशय कमी प्रदूषण सध्या होत असल्याने सर्वच जणांना आरोग्यदायी जीवन मिळत आहे. हवेतील धूलिकणही कमी झाल्याने लांबवरील वस्तू दिसण्याची क्षमता वाढली आहे. प्रदूषणाचा स्तर 35 अंकांपर्यंत खाली येणे पशुपक्ष्यांसह मानवाच्या दीर्घायुष्यासाठी चांगले असते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon no rain but temprature high lavel