Loksabha 2019 : प्रचाराची धडाडी, लगबग ‘दादा’सारखीच! 

सी. एन. चौधरी
रविवार, 14 एप्रिल 2019

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात प्रचार केला व मेळाव्यालाही उपस्थिती दिली. 

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात प्रचार केला व मेळाव्यालाही उपस्थिती दिली. 
गुरुवारी भल्या पहाटे साडेपाचच्या सुमारास उठून थोडा मॉर्निंग व योगा करून अवघ्या तासाभरात सर्व विधी आटोपून आमदार उन्मेष पाटील यांनी सव्वासहाच्या सुमारास घरातील देव्हाऱ्यातील देवांची पूजा केली. आई मंगलाबाई व वडील भय्यासाहेब पाटील यांचा चरणस्पर्श केला. पत्नी संपदा पाटील यांनी त्यांचे औक्षण करून कपाळी टिळा लावला. मुलगा स्वामी, समर्थ व मुलगी सृष्टी हेदेखील झोपेतून उठून दादांजवळ आले. त्यांना जवळ घेऊन मायेने कुरवाळत त्यांची विचारपूस करून वर्तमानपत्रे न्याहाळली व निवडणुकीसंदर्भातील बातम्यांचा त्यांनी परामर्श घेतला. यासोबतच कालच्या नियोजनात काय अपूर्णता राहिली, याचाही मागोवा घेऊन राहून गेलेली प्रलंबित कामे करण्यासंदर्भात आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी सूचित केले. 
सकाळी पावणेसातच्या सुमारास लाल रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा, गळ्यात भाजप- शिवसेना व ‘आरपीआय’चे रुमाल टाकून ते बैठकीस आले. घरी आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिवसभरातील नियोजनासंदर्भात जाणून घेऊन अल्पसा नाश्ता व ताक घेऊन ते आपल्या निवडक सहकाऱ्यांसह गाडीत बसले. 
घरातून बाहेर पडल्यानंतर पाचोरा तालुक्याच्या हद्दीपर्यंत येताना अनेक ठिकाणी थांबून ज्येष्ठांचा चरणस्पर्श करीत समवयस्कांच्या हातावर टाळी घेत व तरुणांच्या पाठीवर हात ठेवत प्रत्येकाची आस्थेवाइकपणे विचारपूस करून प्रचार करीत सव्वासातच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील सार्वे गावी पोहोचले. गाव पाराजवळ त्यांचे घोषणाबाजी करीत स्वागत करण्यात आले. गावातून फेरफटका मारून दिलीप पाटील यांच्याकडे चहा घेऊन संपूर्ण गावातून त्यांनी ग्रामस्थांशी संपर्क करीत फेरी मारली. त्यानंतर नऊच्या सुमारास खाजोळे गावात त्यांनी प्रचारफेरी काढली. गावातील सरपंच, विकास सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे हालहवाल जाणून घेत त्यांना मतदानाचे आवाहन केले. गावातून प्रचारफेरी आटोपून ते पाचोरा येथे आयोजित मेळाव्यात निघाले. रस्त्यात नगरदेवळा व भडगाव येथे थांबून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत स्वीकारून दुपारी पाचोरा येथील मेळाव्यासाठी मार्गस्थ झाले. सारोळा रस्त्यावरील समर्थ लॉन्सवर दुपारी आयोजित मेळाव्यास त्यांनी उपस्थिती दिली. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, अमोल शिंदे यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नियोजनासंदर्भात चर्चा केली. 
मेळाव्यास्थळी उपस्थितांमध्ये जाऊन मतदानासंदर्भात हात जोडून आवाहन केले. मेळाव्यात आपल्या भविष्यातील कामकाजासंदर्भात व नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वासंदर्भात स्पष्टीकरण करून मतदानाचे नम्र आवाहन केले. मेळावा संपल्यानंतरही भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख यांची गळाभेट घेऊन प्रचारकार्यात गती आणण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. 
त्यानंतर भडगाव रस्त्यावरील निर्मल रेसिडेन्सीमध्ये येऊन त्यांनी शांताराम पाटील, संजय पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अल्पसे भोजन घेतले. थोडी विश्रांती घेऊन शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, वकीलवर्ग, विविध सेवाभावी संस्था- संघटनांचे पदाधिकारी यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. 

सुमारे एक तासानंतर ते शहरातील ‘शिवतीर्थ’ या शिवसेना कार्यालयात उपस्थित झाले. तेथे त्यांनी भाजप, शिवसेना व एकूणच युतीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. आमदार किशोर पाटील यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शहरातून सवाद्य प्रचार रॅली काढली. संपूर्ण शहरातून प्रचार रॅली काढून मतदारांशी संपर्क साधत सायंकाळी तालुक्यातील लोहारी येथे ते पोहोचले. येथेही प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून गावातून प्रचार रॅली काढली. त्यानंतर राजुरी, शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. पिंपळगाव हरेश्वर येथे बराच वेळ थांबून ग्रामस्थांशी हितगूज केले. रात्री दहाच्या सुमारास ते चाळीसगावकडे रवाना झाले. 

शेतकऱ्यांशी चर्चा 
पाचोरा येथून राजुरी, लोहारीकडे जाताना रस्त्याने जात असलेल्या शेतकऱ्यांशी हितगूज करण्यासाठी त्यांनी गाडी थांबवून त्यांची आस्थेवाइकपणे विचारपूस केली. शेतीविषयक माहिती जाणून घेतली, तर काहींनी त्यांच्यासोबत चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

‘दादा, तूच निवडी येशी’ 
पिंपळगाव हरेश्वरला जाताना गावालगतच आपल्या घरासमोर अंगणात बसलेल्या गया आजीची त्यांनी भेट घेतली. त्यांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचा गालगुच्चा घेत, ‘दादा तूच निवडी येशी पन निवडी उना तं शेतकरी व मजूरेस्ले इसरू नको, तू खूप मोठा व्हशी’ असा आजीबाईंचा आशीर्वाद मिळवला. शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर येथे युवक व समर्थकांशी त्यांनी मित्रांसमान मनसोक्त गप्पा मारून त्यांच्या राजकीय भविष्यातील वाटचालीसंदर्भातील माहिती मिळवून त्यांना ‘आदर्श नागरिक व्हा,’ असा बहुमोल सल्ला दिला. 

अपंगांना दिलासा 
पाचोरा येथे अपंग युवकाशी त्यांनी हस्तांदोलन करून अपंगांच्या मतदानासाठी विशेष सुविधा असल्याचे सांगून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्याला भविष्यात काही मदत लागल्यास निःसंकोचपणे सांगण्याचे आवाहन करून सहकार्याबाबत आश्वासित केले. रात्री साडेदहाच्या सुमारास ते आपल्या निवडक सहकाऱ्यांसह चाळीसगावकडे रवाना झाले व सुमारे पावणेबाराच्या सुमारास आपल्या निवासस्थानी जाऊन घरी आलेल्या पदाधिकारी व कार्यकत्यांची विचारपूस करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काहींशी मोबाईलद्वारे संपर्क करून कामांची माहिती दिली व आपल्या सहाय्यकास उद्याच्या नियोजनासंदर्भात माहिती विचारून प्रचारदौरा असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यासंदर्भात सांगितले. सकाळी सातपासून मध्यरात्रीपर्यंत प्रचारदौऱ्यात शेवटपर्यंत तोच जोश, तोच आनंद व्यक्त करणारे उन्मेष पाटील खऱ्या अर्थाने ‘दादा’च असल्याचे त्यांच्या दिनचर्येवरून दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon one day with candidate unmesh patil