कोरोना वॉरियर्सच्या पाल्यांचे "नोबेल' बनणार पालक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

"कोरोना'विरोधातील लढाईत वैद्यकीय यंत्रणेतील घटक, पोलिस दलातील जवान, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील वॉरियर रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 
- जयदीप पाटील, संचालक, नोबेल फाउंडेशन 

जळगाव  : कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्षमपणे उतरलेल्या डॉक्‍टर्स, नर्स, पोलिस, होमगार्ड, सफाई कामगार, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार या कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून त्यांच्या पाल्यांना अकरावी, बारावी या शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अशा 60 विद्यार्थ्यांचे पालकत्व नोबेल फाउंडेशन स्वीकारणार आहे. 

जळगाव शहरातील शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोबेल फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र रक्षक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात या सर्व कोरोना योद्‌ध्यांच्या 60 मुला-मुलींना अकरावी व बारावी या शैक्षणिक वर्षांसाठी तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, एनडीए प्रवेश परीक्षांसाठी सवलतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ऑनलाइन परीक्षेद्वारे निवड चाचणी घेण्यात येईल. 

गरजू पाल्यांनाही लाभ 
बेरोजगारीची झळ पोहचलेल्या कुटुंबातील पाल्यांनाही या शिष्यवृत्तीद्वारा शिक्षण मिळणार आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी नोबेल फाउंडेशनच्या आयएमआर कॉलेजजवळील कार्यालयात संपर्क करावा. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, पुस्तके, नोटबुक, शाळेचे कपडे, शालेय साहित्य, शाळेची फी, तसेच परीक्षा फी अशी गरजेनुसार मदत दिली जाईल. 

यांचे मिळणार सहकार्य 
या शिष्यवृत्ती योजनेसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, भरारी फाउंडेशन, दीपस्तंभ बहुद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, पुखराज पगारिया फाउंडेशन, सुकृती पिनॅकल हौसिंग सोसायटी, लक्ष्मी ऍग्रो व ग्रीनस्टार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी बांभोरी यांचे सहकार्य लाभत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Parents of Corona Warriors kids will become "Nobel"