रामानंदनगर परिसरातील रेशनदुकानाचा परवाना रद्द.. 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

संबंधित रेशन दुकानदार वेळेत धान्य वितरण करीत नाही, कमी प्रमाणात धान्य वाटप करतो, मद्यपान करून धान्य वाटप करतो तसेच महिलांशी उद्धटपणे बोलून, गैरवर्तन करतो यासह शासनाचे सर्व नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले होते.

जळगाव  : कार्डधारकांना 12 अंकी नंबर देण्यासाठी पैशाची मागणी, ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरित न करणे यासह दारू पिऊन धान्याचे वाटप करणे अशा विविध तक्रारी प्राप्त झालेल्या रामानंदनगरातील विमल बाळासाहेब गायकवाड यांच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केली. 

रामानंदनगर परिसरातील रेशन दुकानदाराच्या अनेक तक्रारी येत असल्याने तहसीलदार यांनी रेशन दुकानाची तपासणी केली होती. त्यांना तक्रारींची परिस्थिती याठिकाणी दिसून आली होती. त्यानुसार त्यांनी अहवाल सादर केला होता. या मध्ये तहसीलदार यांना संबंधित रेशन दुकानदार वेळेत धान्य वितरण करीत नाही, कमी प्रमाणात धान्य वाटप करतो, मद्यपान करून धान्य वाटप करतो तसेच महिलांशी उद्धटपणे बोलून, गैरवर्तन करतो यासह शासनाचे सर्व नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले होते. याबाबत वारंवार सूचना देऊन गायकवाड यांच्याकडून कुठलीही सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आले होते. 

पुरवठा अधिकाऱ्यांनी काढले पत्र 
विमल गायकवाड हे वारंवार शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानाचे गायकवाड यांचे प्राधीकार पत्र रद्द करून ते किशोर प्रल्हाद पाटील यांना चालविण्यास द्यावे, असा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पुरवठा अधिकारी यांनी गायकवाड यांचे प्राधीकारपत्र रद्द करण्याचे आदेश काढले. 

म्हणून केले प्राधीकारपत्र रद्द 
तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार पुरवठा अधिकारी यांनी (ता. 23) एप्रिलला विमल गायकवाड यांना नोटीस बजावून सुनावणी ठेवली होती. या सुनावणीला लेखी किंवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. सुनावणीसाठी विमल गायकवाड यांचे पती बाळासाहेब गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनी नोटिशीबाबत कुठलाही खुलासा सादर केला नसून त्यांच्यावरील दोषांबाबत ते समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गायकवाड यांचे प्राधीकारपत्र रद्द करून ही कारवाई केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon pepole complet Ration shop license revoked.