चोरीच्या वाहनांच्या तपासात पुण्यातील खुनाचा उलगडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नशिराबाद : पुणे येथून वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपींकडून अडीच वर्षापूर्वी कोंढवा (पुणे) येथे केलेल्या खुनाचा उलगडा उघडकीस आला आहे. नशिराबादसह परिसरात चोरीच्या विकण्यात आलेल्या सुमारे 6 लाखांच्या ऍपेरिक्षा, टेम्पो पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जळगावातील पोलिसांच्या मदतीनेही कारवाई केली. 

नशिराबाद : पुणे येथून वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपींकडून अडीच वर्षापूर्वी कोंढवा (पुणे) येथे केलेल्या खुनाचा उलगडा उघडकीस आला आहे. नशिराबादसह परिसरात चोरीच्या विकण्यात आलेल्या सुमारे 6 लाखांच्या ऍपेरिक्षा, टेम्पो पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जळगावातील पोलिसांच्या मदतीनेही कारवाई केली. 

पुण्यातील कोंढवा पोलिस ठाणे परिसरात सन 2018 मध्ये वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुणे येथील रहिवासी वसीम अजमल खान (मूळ रहिवासी नशिराबाद) या संशयितास पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. हा आरोपी व त्याचे इतर दोन साथीदार रमजान हसन शेख व अन्सार अयुबखान यांनी वाहनांची चोरी करून विक्रीचा सपाटा सुरू केला. 

खुनाचा तपास उघड 
यासंदर्भात विक्री केलेल्या चोरीची वाहनांची चौकशी करीत असताना वसीम खान याने ऑगस्ट 2017 मध्ये पुणे-येरवडा कारागृहातील सेवानिवृत्त पोलिस हवालदार अनिल लोंढे यांचा पुत्र निखिल याचा खून केल्याची माहिती समोर आली. या खुनात वसीम अजमल खान यासह इमरान रऊफ शेख, अहमद अयुब खान दोघेही रा. कोंढवा व मृत आरोपी शाहरूख उर्फ खड्ड्या नूर हसन खान हे सामील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी चोरी केलेली वाहने नशिराबाद परिसरात विकल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे येथील सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, अमित साळुंखे, संजय कळंबे, ज्योतिबा पवार व पोलिस पथकाने नशिराबाद येथे दोन दिवस तळ ठोकले. वसीम खान याने विकलेल्या वाहनांची माहिती दिली त्यावरून चोरीची वाहने घेणाऱ्यांची चौकशी करून वाहने जप्त केली आहेत. त्यात 5 लाख 95 हजार रूपये किमतीची पाच वाहने व एका गाडीचे इंजिन पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात वसीमचे मूळ गाव असलेल्या नशिराबाद येथून दोन तर सासरवाडी असलेल्या फैजपूर येथून तीन वाहने जप्त करण्यात आली. दरम्यान, वसीम खान याने अफसर उस्मान बेग व भूषण बाबुराव पाटील (दोघे रा.नशिराबाद), रफिक इब्राहिम तडवी व फारूक कयुम मलक (दोघे रा. फैजपूर), सलीम गौस महंमद शेख (रा.रावेर) यास गाड्या विकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वाहने जप्त केली असल्याची माहिती पुणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police arrest vheical robbary but open pune murder case