"आमचे हात बांधलेत, काय करणार - असे कोण म्हणाले.. वाचा सविस्तर.. 

"आमचे हात बांधलेत, काय करणार - असे कोण म्हणाले.. वाचा सविस्तर.. 

जळगाव : खानदेशात व पर्यायाने जळगाव शहरासह जिल्ह्यातही "कोरोना'चा संसर्ग वाढत असताना "लॉकडाउन'चा पूर्णपणे फज्जा झालेला दिसतोय. टाळेबंदी असतानाही नागरिक अत्यंत बेजबाबदारपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. दुर्दैवाने प्रशासन याप्रश्‍नी अजिबात गंभीर नाही, आणि पोलिस यंत्रणाही बघ्याच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना याबाबत छेडले असता "काय करणार साहेब.. आमचे हात बांधलेत?' अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त झाली. आता पोलिसांचे हात कुणी व का बांधले? हे मात्र मोठे कोडेच आहे. 
"कोरोना' संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी "लॉकडाउन' जारी करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसह आपत्कालीन सुविधांना या "लॉकडाउन'मधून वगळले असले तरी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, विनाकारण बाहेर पडू नये असे बजावण्यात आले आहे. खानदेशात गेल्या आठवड्यापर्यंत "कोरोना'चा प्रभाव जाणवत नव्हता. मात्र, आठवडाभरात जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण आढळणे सुरू झाले आणि हा आकडे 30 वर गेला. 

जळगावात गांभीर्य नाही 
जळगाव शहरासह जिल्ह्यातील "कोरोना'ग्रस्तांचा आकडा अकरावर पोहोचला असून, तिघांचा मृत्यू झाला. तरीही लोक सुधरायला तयार नाहीत. जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसतात. "लॉकडाउन'चे पहिले दहा-बारा दिवस पोलिसांनी जळगाव शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर बऱ्यापैकी वचक ठेवला. नंतर टप्प्या-टप्प्याने हा धाक संपत गेला. आता 20 एप्रिलनंतर काही उद्योग, व्यवसायांसाठी "लॉकडाउन'चे नियम शिथिल केल्यानंतर तर नागरिक सर्रास रस्त्यावर उतरू लागले. बाजारात, भाजी घेताना, मेडिकल अशा सर्वच ठिकाणी गर्दी दिसू लागली आहे. नागरिकांना त्याचे कुठलेही गांभीर्य नाही. खरेदी करतानाही बऱ्याच ठिकाणी लोकांच्या तोंडावर न मास्क असते, ना कुठे "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन होताना दिसते. 

पोलिस गप्पांत, नागरिक सुसाट 
"लॉकडाउन' सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता, त्या ठिकाणी किरकोळ तपासणी केली जात होती. दुचाकी, चारचाकींना अडविले जात होते. आता गेल्या काही दिवसांपासून तर ही किरकोळ तपासणीही बंद झाली आहे. विनाकारण फिरणारी वाहने, रिक्षांवर कारवाईचे आकडे समोर येतात. पण प्रत्यक्षात कठोर कारवाई होत असल्याचे चित्र दिसत नाही. आतातर जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 7 अशी वेळ निर्धारित करून दिली आहे. मात्र, या वेळेत सकाळी 10 ते दुपारी 12 व सायंकाळी 5 नंतर बाजारात मोठी गर्दी झालेली दिसते. रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, अगदी रिक्षाही फिरू लागल्या आहेत. मात्र, पोलिस त्यांना अडवायला तयार नाहीत. नागरिक रस्त्यावर अन्‌ पोलिस गप्पांमध्ये, असे चित्र पाहिल्यानंतर "लॉकडाउन' खरेच आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

आमचे हात बांधलेत..! 
"लॉकडाउन' असताना सर्रास वापरणाऱ्या नागरिकांना पोलिस हटकत का नाहीत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र, बंदोबस्तावर तैनात पोलिसांशी याबाबत विचारले असता, त्यांनी अत्यंत हतबलपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. "काय करणार साहेब, आमचे हात बांधलेत..' असे काही जण म्हणाले. आता त्यांचे हात कुणी व कशासाठी बांधले, हे समजणे कठीण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com