हाताला काम नाही, गरजा कशा भागवू... प्लंबर कारागिरांसमोर प्रश्‍न 

दीपक महाले  
बुधवार, 15 एप्रिल 2020

देशपातळीवर "लॉकडॉउन' सुरू आहे. त्यामुळे शहरातील छोटे- मोठे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे हातावर रोजंदारी करून कुटुंबीयांची उपजीविका करणारे प्लंबर, कारागीर व बिगारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

जळगाव ः जगात "कोरोना'ने थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 मार्चपासून सुरू झालेला "लॉकडाउन' तीन मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम सर्वच समाजघटकांवर झाला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आर्थिक अडचणीत आले आहेत. "लॉकडाउन'मुळे बांधकाम व्यवसायासह त्यास संलग्न व्यवसायही बंद आहेत. 

शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांतील तरुण प्लंबरचे काम करून कुटुंबाची उपजीविका भागवितात. "लॉकडाउन'मुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यातून मार्ग कसा काढावा व कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात, असा प्रश्न त्यांच्यासमोर "आ' वासून उभा राहिला आहे. 

शहराचा विचार केला, तरी सुमारे पाच ते सहा हजार कारागीर आहेत. त्यांचा उदरनिर्वाह प्लंबिंग व्यवसायावर आहे. प्रत्येक ठेकेदाराजवळ कारागीर व बिगारी असतात. काही दिवसांपासून देशपातळीवर "लॉकडॉउन' सुरू आहे. त्यामुळे शहरातील छोटे- मोठे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे हातावर रोजंदारी करून कुटुंबीयांची उपजीविका करणारे प्लंबर, कारागीर व बिगारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

प्लंबर व्यवसायात काम करणारे सर्व गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे काम केले की पैसे मिळतात. काम नाही तर पैसे नाहीत. आता कामच नाही, तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कुठून येणार? त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर नोंदणी कामगारांप्रमाणे आम्हालाही शासनाने आर्थिक मदत द्यावी. 

- दीपक पावरा, प्लंबर, जळगाव 

"लॉकडॉउन'मुळे बांधकाम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे "प्लंबिंग'ची कामेही बंद आहेत. बांधकाम ठेकेदार काम झाले, की मोबदला देत असतो. आता कामच नाही, तर मोबदला कुठून मिळणार? ग्रामीण भागात कामे मिळत नाहीत. कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- रामसिंग पावरा, प्लंबर ठेकेदार, जळगाव 

सध्या "लॉकडाउन'मुळे कामेच बंद आहेत. त्यामुळे कारागीर व बिगारींची फारच वाईट स्थिती आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्यात कामे मिळत नाहीत अन्‌ शहरी भागात लॉकडॉउन व संचारबंदी आहे. त्यामुळे अशा बिकटप्रसंगी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. 
- संतोष बारेला, प्लंबर, जळगाव 

प्लंबर व्यावसायिकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्याकडून जेवढी मदत करता येईल, तेवढी करतो. आर्थिकही मदत करत आहे. यापुढेही कारागिरांना सहकार्य करीन. शिवाय, किराणा मालाचीही मदत देत आहे. "लॉकडॉउन' संपत नाही, तोपर्यंत बेरोजगारीला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. 

- प्रवीण पाटील, साईश्रद्धा ट्रेडर्स, जळगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Question before plumber craftsmen