विधीमंडळात मांडला "कचराकोंडी'चा प्रश्‍न; आमदार सुरेश भोळे  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

सफाईबाबतचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.जळगाव शहरातील जनतेत याबाबत तीव्र संताप आहे,याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

जळगाव : जळगाव शहरातील साफसफाईचा मुद्दा ऐरणीवर आहे, दररोज त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. विरोधी पक्ष शिवसेना नगरसेवक तर सफाईबाबत आक्रमक आहेत, तर दुसरीकडे जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनीही शहरातील सफाईचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला, त्यांनी थेट मक्तेदारवार कारवाई करण्याची मागणी केली. 

विधीमंडळात आज स्वच्छतेच्या तसेच महापालिकेच्या मुद्यावर चर्चा सुरू होती, त्यावेळी बोलतांना जळगाव शहरातील साफसफाईचा मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले, जळगाव शहरात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, मात्र स्वच्छता केली जात नाही. जळगाव शहरातील स्वच्छतेचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र मक्तेदारामार्फत स्वच्छता केली जात नाही, त्याच्यावर कारवाईचा ठराव केलेला असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सफाईबाबतचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.जळगाव शहरातील जनतेत याबाबत तीव्र संताप आहे,याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आयुक्तांची तातडीने नियुक्ती करावी 
जळगाव महापालिकेत गेल्या दोन महिन्यापासून आयुक्तपद रिक्त असल्याचे सांगून ते म्हणाले, महापालिकेसाठी आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्यामुळे शहरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न रखडला आहे. तसेच विकासाची कामेही रखडली आहेत. शिवाय साफसफाई व स्वच्छतेचा मुद्याही अत्यंत गंभीर बनला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ताबडतोब आयुक्तांची नियुक्ती करावी असे मतही भाजपचे आमदार सुरेश भोळे यानीं विधीमंडळात मांडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The question of vidhimandal MLA Suresh Bhole