rahul patil railway
rahul patil railway

कोणीही विश्वास ठेवणार नाही! प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी ट्रेन दीड किलोमीटर उलटी धावली

जळगाव : धडधड करत रूळावरून धावत येणाऱ्या रेल्वेसमोर कोणी आले तरी लोको पायलटला ती त्याच वेगाने पुढे न्यावी लागत असते. एका जीवापेक्षा हजारो प्राण महत्त्वाचे मानत रेल्वे पुढे निघून जाते. इतकेच नाही, तर समोर कोणी विव्हळत पडलेला दिसला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र याच्या विरूद्ध प्रकार घडला आणि रेल्वेतून पडून जखमी झालेल्या तरूणाला घेण्यासाठी रेल्वे थांबून ती चक्‍क उलटी धावली. 
पाचोरा रेल्वेस्टेशनवरून राहुल पाटील नामक तरूण देवळाली- भुसावळ या पॅसेंजरमध्ये (गाडी क्र.51181) जळगाव येण्यासाठी बसला. गाडीत गर्दी असल्याने आतमध्ये जाण्यास जागा नसल्याने राहुल पाटील हा दरवाजाजवळच उभा होता. दरम्यान त्याचा तोल गेल्याने तो परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान पोल नंबर 383 च्या जवळ तोल गेल्याने खाली पडला. खाली पडल्याने तरूण जखमी झाल्याची घटना आज साडेनऊच्या सुमारास घडली. परंतु या तरूणाला जखमी अवस्थेत न सोडता चक्‍क रेल्वे थांबविण्यात आली आणि ती उलटी धावली. 

साखळी ओढून थांबविली रेल्वे 
पाचोरा येथील एमआयडीसी कॉलनीमधील रहिवासी असलेला राहुल संजय पाटील हा तरुण शिक्षणासाठी रोज पाचोरा ते जळगाव दरम्यान अपडाऊन करतो. आज सकाळी परधाडे रेल्वे स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला. सहप्रवाशी आणि त्याच्या मित्रांनी तत्परता दाखवत साखळी ओढून गाडी थांबविली. तोपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पुढे निघून गेली होती. राहुलचे मित्र आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल हा जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. 

अन्‌ मालगाडीही थांबविली 
शटल थांबविल्यानंतर प्रवाशी राहुलला उचलण्यासाठी गेले असताना दुसऱ्या ट्रॅकच्या अपलाईनवरून जाणारी मालगाडी देखील थांबविण्यात आली. यावेळी शटलचे गार्ड यांनी मालगाडी चालकास जखमीला पाचोरापर्यंत नेण्याची विनंती केली. मात्र त्यास जळगाव येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून त्याला वेळेत उपचार मिळाले तर तो वाचू शकेल. असा संदेश लोको पायलट दिनेश कुमार यांना देण्यात आला. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता माणुसकीच्या नात्याने रेल्वे मागे घेतली. 

गार्ड व लोको पायलट यांचा संवाद 
रेल्वेतून खाली पडल्याने जखमी झालेला तरूण रेल्वे गार्डच्या लक्षात आले. तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी गार्ड व रेल्वेचे लोको पायलट यांनी चर्चा करून रेल्वे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मागे नेत जखमी राहुलला गाडीत टाकले. या जखमी तरुणाला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरु आहेत. अनेक प्रवाशांनी पाहिल्यांदाच गाडी उलटी जात असल्याचे अनुभवले. रेल्वे प्रशासनाने जखमी व्यक्तीसाठी लागलीच गाडी पुन्हा मागे घेत माणुसकीची दाखविल्याची चर्चा रंगली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com