शिवसेनेला नव्या वर्षात त्यांची जागा दाखवा : अमोल मिटकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

धरणगाव : वीस वर्ष सत्तेत राहूनही ज्यांना धरणगाव शहराला मुलभूत सुविधा देता आल्या नाहीत त्या सत्ताधारी शिवसेनेला नव्या वर्षांत त्यांची जागा दाखवा. शहराचा विकास करायचा असेल तर प्रथम शहरातली राजकीय घाण साफ करा. 80 वर्षाचा तरुण नेता अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीला एकदा सत्तेची चाबी देवून पहा, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी येथे केले. 

धरणगाव : वीस वर्ष सत्तेत राहूनही ज्यांना धरणगाव शहराला मुलभूत सुविधा देता आल्या नाहीत त्या सत्ताधारी शिवसेनेला नव्या वर्षांत त्यांची जागा दाखवा. शहराचा विकास करायचा असेल तर प्रथम शहरातली राजकीय घाण साफ करा. 80 वर्षाचा तरुण नेता अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीला एकदा सत्तेची चाबी देवून पहा, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी येथे केले. 

धरणगाव पालिकेच्‍या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश चौधरी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सध्याची निवडणुक पैसा विरुद्ध माणुसकी यांची असल्याचे ते म्हणाले. धरणगाव शहरात गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य वाढले आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. वीस- वीस दिवस नळाला पाणी येत नाही. शहरातल्या तलावांची कामे रखडलेली आहेत. व्यसनाधीनता वाढली आहे. नकली दारु तरुणांचा घात करत आहे. मात्र, हे येथील निर्ढावलेले सत्ताधारी नेते आणि जनतेच्या सोशीकपणामुळे होतेय, असे मिटकरी म्हणाले. सामान्य माणुस जोपर्यंत आवाज उठवत नाही, संघर्ष करत नाही, आपल्या हक्कासाठी भांडत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले. भाजप- सेना यांना त्यांची जागा दाखवा व उद्याचा सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. 
सभेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. आपण सोडलेली अर्धवट कामे देखील गुलाबराव पाटील पूर्ण करु शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी पाणी समस्येवर घणाघाती हल्ला केला. बालकवी स्मारक, क्रीडा संकुल, रस्ते, तलाव या रखडलेल्या कामांची त्यांनी जंत्रीच वाचून दाखवली. स्वतः उमेदवार नीलेश चौधरी यांनी आपण माघार घेणार नाही व पैसे वाटणार नाही, असे आश्वासन दिले. याची खात्री देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या एकुलत्या एक मुलाची व्यासपीठावर शपथ घेतली. मी गरीब उमेदवार आहे. हमाली करणाऱ्या बापाचा मुलगा आहे. मात्र, शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या प्रामाणिकपणाकडे पाहून उमेदवारी दिली हीच आपली श्रीमंती असल्याचे नमूद केले. राष्ट्रवादी पार्टीचे नगरसेवक पालिकेत नसले तरी स्वःहिमतीने मी शहराच्या विकासाचे निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 
सभेला संबोधित करणाऱ्या प्रत्येक वक्त्याने माजी नगराध्यक्ष (स्व.) सलीम पटेल यांच्या स्मृतींना उजाळा देत माणुसकी जपणारा नेता अकाली गेल्याबद्दल खंत व्यक्त केली. सभेत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संजय सोनवणे, ओंकार माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पुष्पाताई महाजन, उमेश नेमाडे, योगेश देसले, डॉ. मिलिंद डहाळे, संभाजी कंखरे, धनराज माळी, नागेश्वर पवार व पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुरवातीला सपक वाटणाऱ्या या निवडणुकीत सानेपटांगणावर झालेल्या या सभेने रंगत भरली आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rashtrawadi amol mitkari dharangaon news