Loksabha 2019 : रावेरमधून डॉ. उल्हास पाटलांसाठी "करो..या...मरो' 

कैलास शिंदे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी खरे आव्हान आहे. एका विजयानंतर तीन पराभव त्यांना पत्करावे लागले आहेत. आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आता कॉंग्रेसमध्ये एकता आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष रिपाइं (कवाडे गट) सोबत आहे.

क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी खरे आव्हान आहे. एका विजयानंतर तीन पराभव त्यांना पत्करावे लागले आहेत. आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आता कॉंग्रेसमध्ये एकता आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष रिपाइं (कवाडे गट) सोबत आहे. त्यामुळे यावेळी त्यांना यश मिळवावेच लागणार आहे; अन्यथा त्यांचे पुढील राजकीय गणितच बदललेले असेल. 

 सातपुड्याच्या कुशीत असलेल्या रावेर तालुक्‍यातील विवरे गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची पदवी घेऊन जळगावात वैद्यकीय सेवेस सुरवात केली. घरात राजकारणाचा गंधही नव्हता. त्यामुळे त्या वाटेला जाणे शक्‍यच नव्हते; परंतु माजी मंत्री (कै.) बाळासाहेब चौधरी यांचा आशीर्वाद त्यांना लाभला. सन 1998 मध्ये कॉंग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी जळगाव जिल्हा हा भाजपचा गड झाला होता. कॉंग्रेसविरोधात वातावरण होते, अशा स्थितीतही त्यांना तब्बल 56 हजार 514 मतानी ते विजयी झाले होते. त्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार आले होते. त्यामुळे विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खासदारकीचा पाच वर्षांचा पूर्ण कालावधी मिळाला नाही. अवघे तेरा महिन्यात सरकार कोसळले, लोकसभा बरखास्त झाली. पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

तेरा महिन्यांचे खासदार 
अवघ्या तेरा महिन्यांचा विरोधी पक्षाचा कालावधी मिळाल्यानंतरही त्यांनी जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले, अर्थात ते खासगी आहे. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहकारी बॅंक, विधी महाविद्यालय, "फॅशन डिझायनिंग' कॉलेज सुरू केले. या संस्था सुरू करणे हा त्यांचा स्वत:चा विकास असे म्हटले जात असले तरी या सुविधांचा आज जनतेला फायदा होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

जिल्ह्यात विविध संस्थांच्या माध्यमातून कार्य करीत असताना त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बांधिलकी कायम ठेवली. अर्थात त्यांच्या संदर्भात अनेक वादही झाले आहेत. निवडणुकीच्या माध्यामातून त्यांनी यश मिळविण्याचा आपला संघर्ष सुरूच ठेवला. सन 1999 मध्ये ते पराभूत झाल्यानंतर 2004 मध्येही त्यांनी कॉंग्रेसतर्फे कडवी लढत दिली, अवघ्या वीस हजार मतांनी ते पराभूत झाले. सन 2007 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सन 2009 मध्ये ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली. तर 2014 मध्येही ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहिली. मात्र, त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसशी आपले नाते पुन्हा कायम ठेवले 
 
जागा कॉंग्रेसला जाणे पथ्यावर 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होती. कॉंग्रेसने या जागेची मागणी केली. मात्र राष्ट्रवादीने लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना उमेदवार न मिळाल्याने अखेर पक्षाने ही जागा मित्रपक्ष कॉंग्रेसला सोडली. कॉंग्रेसतर्फे डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते मंगळवारी अर्ज भरणार आहेत. 

रक्षा खडसेंशी सामना 
डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी लढत सोपी नाही. भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांचा सामना आहे. एकनाथराव खडसे यांचे वलय आहेच, परंतु रक्षा खडसे यांनी खासदार म्हणून आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शिवाय मतदारसंघात त्यांचा संपर्क दांडगा असून, मतदारसंघात बांधणीही त्यांनी चांगली केली आहे. अशा स्थितीत डॉ. पाटील यांना यशासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहे. डॉ. पाटील यांना या मतदार संघाची चांगली ओळख आहे, विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्वत:ची यंत्रणा आहे. यावेळी कॉंग्रेसमध्ये कोणतीही दुफळी दिसत नाही ही जमेची बाजू आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षही सोबत आहे. अशा स्थितीत त्यांना अनुकूल वातावरण दिसत आहे. मात्र ते स्वत: याचा फायदा कसा करून घेतात यावरच त्यांचे यश अवलंबून आहे. चौथ्यांदा मैदानात उतरलेल्या डॉ. पाटील यांना यश मिळवावेच लागणार आहे, आता पराभव झाला तर मात्र त्यांना राजकारणात पुढील सर्वच गणित कठीण होतील, हे मात्र निश्‍चित. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक "करो..या...मरो..'ची स्थिती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

Web Title: marathi news jalgaon raver loksabha Dr ulhas patil