रेडक्रॉसचा फिरता दवाखाना...गरिब रुग्णांसाठी ठरतोय संजिवनी ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

साधा ताप, खोकल्यावरही औषधोपचार होत नाही. ही स्थिती लक्षात घेता रेडक्रॉसने फिरता दवाखाना म्हणून एक व्हॅनच तयार केली. त्यात दोन डॉक्‍टर, एक नर्स, तीन स्वयंसेवक नेमण्यात आले. फिरत्या दवाखान्याची व्हॅन विविध उपनगरात जाते.

जळगाव : "कोरोना'मुळे संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना घराच्या बाहेर निघणे मुश्‍कील झाले आहे. शहरात अनेक खासगी डॉक्‍टरांची रुग्णालयेही बंद असल्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नसल्याने शहरातील विविध भागातील रुग्ण भीतीपोटी घरीच बसून आहेत. त्यावर उपाय म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हाशाखेतर्फे शहरात फिरता रेडक्रॉस दवाखाना सुरू करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावाने शहरातील विविध भागात, उपनगरातील खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. साधा ताप, खोकल्यावरही औषधोपचार होत नाही. ही स्थिती लक्षात घेता रेडक्रॉसने फिरता दवाखाना म्हणून एक व्हॅनच तयार केली. त्यात दोन डॉक्‍टर, एक नर्स, तीन स्वयंसेवक नेमण्यात आले. फिरत्या दवाखान्याची व्हॅन विविध उपनगरात जाते. गरजू रुग्ण या व्हॅनजवळ येऊन डॉक्‍टर त्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी दिली जाते. 

दररोज शंभर रुग्णांची तपासणी 
रेडक्रॉसतर्फे सुरू असलेल्या फिरता दवाखान्यात आठ दिवसांत 1250 लोकांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. या फिरत्या दवाखान्यात डॉ. शंकर सोनवणे, डॉ. अरविंद चौधरी, डॉ. राजेश सुरवडकर व रेडक्रासचे कर्मचारी स्वयंसेवक कार्यरत आहेत. 

एमआयडीसीत कामगारांची तपासणी 
शहरातील विविध भागात रुग्णांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन दिवसांनी एमआयडीसीतील सुरू असलेल्या दालमील व अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार रेडक्रॉस फिरता दवाखाना सुरू केला आहे. याद्वारे शहरातील विविध भागातील गरजू रुग्णांची, भाजी विक्रेत्यांच्या तपासणी करणे, फूड पॅकेट वितरण करणे, रक्तदानाची जनजागृती करणे आदी कार्य यामाध्यमातून सुरू आहेत. गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा. 
-डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, रेडक्रॉस सोसायटी जळगाव. 

लॉकडाउन नंतर बहुतेक डॉक्‍टरांनी आपले दवाखाने बंद केले असल्याने शहरातील रुग्णांची गैरसोय होत असल्याने या उपक्रमाची कल्पना सुचली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून लॉकडाउनपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. 
-विनोद बियाणी, सचिव रेडक्रॉस सोसायटी, जळगाव. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "The Red Cross' Rotation." Response to the dispensary 1250 patients examined