शेतकऱ्यांचा शिल्लक कापसाची तपासणी होणार : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी कितीकापूस शिल्लक आहे किंवा कसे ? याची तपासणी करणे गरजेचे आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अद्याप 43 हजार 498 शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक आहे. शासनातर्फे कापूस खरेदीचे दर बाजारमुल्यापेक्षा अधिक आहे.यामुळे काही व्यापारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस विक्रीची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात किती कापूस शिल्लक आहे याची तपासणी, पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाद्वारे ही तपासणी दोन दिवसात होणार आहे. 

जिल्ह्यात 22 मेअखेर 48 हजार 391 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्याकडे नोंदणी केली आहे. आजअखेर 4 हजार 893 शेतकऱ्यांकडील कापसाची विक्री झाली आहे. अद्यापही 43 हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस विक्री बाकी आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे याचा निश्‍चित अंदाज बांधता येत नाही. जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी कितीकापूस शिल्लक आहे किंवा कसे ? याची तपासणी करणे गरजेचे आहे. 

शासनाचा कापूस खरेदी दर व्यापाऱ्यांकडील दरापेक्षा अधिक आहे. यामुळे काही व्यापारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा कापूस विक्रीची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा गोष्टींवर नजर ठेवणे गरजेचे आहे. फक्त शेतकऱ्यांचाच कापूस हमी भावाने घेतला गेला पाहिजे. यामुळे सर्व सहाय्यक निबंधकांनी (सहकारी संस्था) त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या बाजार समितीयांकडून कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या गाव निहाय याद्या शेतकऱ्यांचे नाव, गट, सर्वे क्रमांक संपूर्ण पत्ता यांच्यासहित याद्या प्राप्त करून घ्याव्यात. याकामी बाजार समितीच्या सचिवांनी सहकार्य करावे. सदरील गाव निहाय याद्यांची पडताळणी करून त्या याद्या संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे सादर कराव्या. 

पंचनामा जागेवर जाऊन करा 
तहसीलदारांनी नियोजन करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी गावा निहाय याद्यांचे वाटप करावे. 
संबंधितांनी नेमून दिलेल्या गाव निहाय याद्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी प्रत्यक्षात किती कापूस शिल्लक आहे याची तपासणी करावी. तपासणीसाठी उपलब्ध असलेला 7/12 उताऱ्यावरील कापूस पिकाखालील एकूण क्षेत्राची नोंदीवरून खात्री करावी. प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेल्या कार्यवाहीचा पंचनामा करावा. शक्‍य झाल्यास कापूस साठ्याचे मोबाईलमध्ये फोटो घ्यावेत. 

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य 
पंचनामा झाल्यानंतर ते पंचनामा संबंधित सहाय्यक निबंधकांकडे पुढील कार्यवाहीसाठी द्यावेत. तालुक्‍यातील सहाय्यक निबंधकांनी पंचनाम्याप्रमाणे यादी बाजार समितीमार्फत यादीत नमूद शेतकऱ्यांचा कापूस प्राधान्याने खरेदी करावा. शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस बाजार समितीत येणार नाही याची दक्षता घ्यावी. 
सर्व बाजार समित्यांनी नोंदणीकृत शेतकऱ्यास प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य द्यावे. खरेदीचा अहवाल रोज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. 

शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केंद्रावर यावा याची दक्षता म्हणून शिल्लक कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यावरून किती कापूस शिल्लक आहे याची माहिती मिळेल. तो साठविण्यासाठी नियोजन करता येईल. 

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The remaining cotton of the farmers will be inspected