अरे बापरे.. दरोड्यातील अट्टल गुन्हेगार...आणि चोरी केली गव्हाच्या पोत्यांची ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 एप्रिल 2020

गुदामाचे दार उघडे असताना सुरक्षारक्षकांना चकवा देत तब्बल नऊ पोती गहू चोरट्याने नेल्याचा प्रकार भरदुपारी घडला. सुरक्षारक्षकांनी माहिती कळविल्यावर साठा अधीक्षक साहेबराव शेनफडू चौधरी यांनी धाव घेतली.

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गुदाम आहे. आज दुपारी सुरक्षारक्षकांना चकवा देत तीन चोरट्यांनी चक्क नऊ पोती गहू लंपास केल्याचे आढळून आले. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पाठलाग करून दोन संशयितांना मुद्देमालासह पकडले असून, एकजण फरार झाला आहे. अटकेतील संशयीत जबरी लूट, दरोड्यातील गुन्हेगार असून, नुकताच जामिनावर सुटला असून, पहिलाच गुन्हा धान्य गुदाम लुटल्याचा त्याने केला आहे. 

औद्योगिक वसाहत परिसरातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या 36 नंबरच्या गुदामात आज माल उतरवून कीड लागू नये म्हणून गुदामाचे दार उघडे असताना सुरक्षारक्षकांना चकवा देत तब्बल नऊ पोती गहू चोरट्याने नेल्याचा प्रकार भरदुपारी घडला. सुरक्षारक्षकांनी माहिती कळविल्यावर साठा अधीक्षक साहेबराव शेनफडू चौधरी यांनी धाव घेतली. 36 नंबरच्या गुदामातून गव्हाची नऊ पोती लंपास झालेली होती. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविल्यावर पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या पथकातील उपनिरीक्षक विशाल वाढोरे, महेंद्रसिंग पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद यांनी धाव घेतली. 

पाठलाग करून अटक 
पोलिस पथकाने संशयिताचा सिनेस्टाइल पाठलाग करून दिनकर रोहिदास चव्हाण ऊर्फ पिन्या व साई आठे यांना अटक केली. त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

पिन्या अट्टल गुन्हेगार 
अटकेतील दिनकर रोहिदास चव्हाण ऊर्फ पिन्या हा नुकताच दरोड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला असून, त्याने चक्क धान्य गुदामातूनच लूट केल्याने पोलिसही चक्रावले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon From robbery criminals Warehouse corporation looted in the warehouse