esakal | coronavirus : जळगावात आणखी पाच संशयित...ग्रामीण रुग्णालयातही संशयितांचे नमुने घेणार 

बोलून बातमी शोधा

coronavirus : जळगावात आणखी पाच संशयित...ग्रामीण रुग्णालयातही संशयितांचे नमुने घेणार 

सोमवारी जिल्ह्यातील 4 पुरुष व एक महिला असे एकूण पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले आहे.यात जळगाव येथील 38 वर्षीय तरुण दुबई येथून 21 मार्चला शहरात आला होता. त्याला घशात त्रास होत आहे.

coronavirus : जळगावात आणखी पाच संशयित...ग्रामीण रुग्णालयातही संशयितांचे नमुने घेणार 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्हाभरात "कोरोना'ची चाचणी करण्यासाठी व नमुने घेण्यासाठी संशयिताला जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. परंतु, शासनाने आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे नमुने घेण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, विदेशातून आलेले कोरोनाचे पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले असून, सोमवारपर्यंत 
 संशयितांचा आकडा हा 28 वर पोहोचला आहे. 

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच आहे.सोमवारी जिल्ह्यातील 4 पुरुष व एक महिला असे एकूण पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले आहे. यात जळगाव येथील 38 वर्षीय तरुण दुबई येथून 21 मार्चला शहरात आला होता. त्याला घशात त्रास होत आहे. दुसरा 24 वर्षीय संशयित हा अरब अमिरातीतून 13 मार्चला आला असून, त्याला सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळून आली आहेत. फैजपूर येथील तिसरा 32 वर्षीय तरुण थायलंड येथून 5 मार्चला आला असून, त्याला घशात त्रास होत आहे. तसेच 54 वर्षीय महिला ही 15 मार्चला दुबई येथून आली असून, त्या महिलेला ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. पाचवा संशयित 29 वर्षीय एरंडोल येथील व्यक्ती मुंबई येथील आहे. या सर्वांच्या थुंकीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. 

याठिकाणी नमुने घेण्याची सुविधा 
जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भुसावळ, पारोळा, एरंडोल, भडगाव, अमळगाव, रावेर, न्हावी, पाल, यावल यासह जिल्हाभरातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या व्यक्तींचेच घेणार नमुने 
राज्य आरोग्य विभागाने कोरोनाबाबत नियमावली आखून दिली आहे. यामध्ये जी व्यक्ती विदेशातून प्रवास करून आलेली आहे, कोरोनाग्रस्ताच्यासंपर्कात आलेली व्यक्ती, एआरडी (ऍक्‍युरेट रेस्पिरेटरी डिस्प्लेट) म्हणजेच श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्ती. ही तीन लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचीच कोरोनाची चाचणी होणार असून, त्यांचेच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

आतापर्यंत 19 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' 
जिल्हाभरातून आतापर्यंत 28 कोरोनाचे संशयित दाखल झाले आहे. यामध्ये आज पाच नवे संशयित दाखल झाले आहे. यातील 19 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, 2 जणांचा अहवाल रिजेक्‍ट करण्यात आला आहे. तसेच 7 संशयित रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत असून जिल्हा कोरोना कक्षात सद्य:स्थितीत 7 जणांवर उपचार सुरू आहेत. 


पुण्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ 
जिल्हाभरातून बहुतेक युवक नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास आहेत. पुण्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पुणे येथे असलेले विद्यार्थी आपल्या मूळ गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांना सर्दी, डोकेदुखी, तापाची लक्षणे दिसत असून आज सुमारे पंधरा- वीस विद्यार्थी कोरोनाची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. परंतु, या विद्यार्थ्यांची पार्श्‍वभूमी बघता त्यांची कोरोनाची चाचणी करणे गरजेचे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, आमची चाचणी करण्यास वैद्यकीय यंत्रणा टाळाटाळ करीत असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. 

कोरोना अपडेट ( 23 पर्यंत) 
एकूण संशयित : 28 
अहवाल प्राप्त : 19 (निगेटिव्ह) 
रिजेक्‍टेड नमुने : 2 
प्रलंबित : 7