"त्या' रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे "सर्च ऑपरेशन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

"कोरोना'चा रुग्ण अजून किती व्यक्तींच्या संपर्कात आला आहे, याबाबत अद्याप खुलासा झाला नसताना देखील नागरिकांकडून कोणत्याच प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आज दिसून आले. 

जळगाव: शहरात "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा रुग्ण कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहे, याबाबतची माहिती महापालिकेकडून घेतली जात आहे. त्यासाठी 47 पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात दोन कर्मचारी आहेत. मात्र, नागरिकांचा परिसरात मुक्त संचार करीत असल्याने अद्याप देखील कोणतीच खबरदारी घेतली जात नसून, त्यांना अजूनही परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे चित्र मेहरुण परिसरात दिसून येत आहे. 

खानदेशात "कोरोना'चा पहिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. दुसऱ्या दिवशी मेहरुणचा संपूर्ण परिसर "लॉकडाउन' करून महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण यंत्रणा वापरून हा परिसर निर्जंतुक करण्यात आला. या परिसरात रविवारी दिवसभर भीतीपोटी नागरिकांनी घराबाहेर येणे देखील टाळले. मात्र, आज नागरिक बिनधास्त वावरत असल्याचे दिसून आले. तसेच "कोरोना'चा रुग्ण अजून किती व्यक्तींच्या संपर्कात आला आहे, याबाबत अद्याप खुलासा झाला नसताना देखील नागरिकांकडून कोणत्याच प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आज दिसून आले. 

"मेहरुण'ची स्थिती विदारक 
मेहरुण परिसरात आजनागरिकांनी संचारबंदीचे सर्व नियम धाब्यावर बसवीत सर्रास ठिकठिकाणी घोळक्‍याने उभे राहून गप्पा करीत असल्याने येथील परिस्थिती अत्यंत विदारक असल्याने चित्र आज मेहरुण परिसरात दिसून आले. दरम्यान, संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाच्या अहवालाबद्दल या परिसरात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. अनेकांकडून अद्याप देखील गांभीर्याने घेतले जात नाही. 

माहिती संकलनाचे काम सुरू 
महापालिकेच्या दवाखाना विभागाकडून रविवारपासून कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे. तसेच ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे, त्यांचा देखील शोध घेतला जात आहे. यासाठी 47 पथके तयार करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे 27 संशयितांचा शोध घेण्यात आला आहे. 

पोलिसांकडूनच आदेशांचे उल्लंघन 
मेहरुण परिसर अगोदरच संवेदनशील आहे, यातच याच परिसरातील नागरिकांची तपासणी केली जात असल्याने कुठलीही अपरिचित घटना होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, सकाळपासून या परिसरात पोलिस फिरकलेच नसल्याने पोलिसांकडूनच संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "The search operation of those 'contact patients'