Loksabha 2019 : महाजनांनी केलेल्या अन्यायाचा सोक्षमोक्ष लावा, तरच प्रचार: सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद, महापालिकेत युती करून सत्तेत वाटा लोकसभेपूर्वीच द्यावा, अन्यथा आम्ही भाजप उमेदवाराचे काम करणार नाही असा रोष शिवसैनिकांनी जळगाव येथील बैठकीत व्यक्त केला. 

जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद, महापालिकेत युती करून सत्तेत वाटा लोकसभेपूर्वीच द्यावा, अन्यथा आम्ही भाजप उमेदवाराचे काम करणार नाही असा रोष शिवसैनिकांनी जळगाव येथील बैठकीत व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या प्रचाराबाबत निर्णय घेण्यासाठी आज सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात बैठक आयोजित केली होती. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, आदी उपस्थित होते. प्रारंभी पाचोऱ्याचे दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मंत्री महाजनांवर संताप 
सभेला सुरवात झाल्यानंतर जळगाव लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुका प्रमुखांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्यावर रोष व्यक्त केला. त्यांनी ग्रामपंचायत, पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत. साडेचार वर्षात भाजपने शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. भाजपने ग्रामपंचायतीपासून तर थेट जिल्हा परिषदेपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत अभद्र युती केली आहे. त्याबाबत स्पष्टपणे निर्णय घेण्यात यावा. त्यानंतरच आम्ही पक्षाच्या प्रचाराचे काम करणार आहोत. असे मतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

फरफटत जाणार नाही : मंत्री पाटील 
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, भाजपने पदाधिकारी, शिवसैनिकांवर अन्याय केला आहे, परंतु त्या अन्यायातून आपणही सुटलेलो नाही. आईचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला जेलमध्ये जावे लागले. यापेक्षा कोणताही मोठा आपल्यावरचा अन्याय असूच शकत नाही. शिवसेनेला भाजपच विचारातच घेत नाही, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला सन्मान दिला पाहिजे, आम्ही त्यांच्यामागे फरफटत जाणार नाही. अगोदर त्यांनी जिल्हा परिषद, महापालिकेतील सत्तेतील युतीचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच घ्यावा त्यानंतरच त्यांचा प्रचार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या अध्यक्षा महानंदा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
महाजनांसोबत बैठकीत सोक्षमोक्ष : सावंत 
संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, भाजपने आमच्यावरही अन्याय केला आहे. मुंबईत शिवसेनेची युनियन आहे, त्या ठिकाणी कॉंग्रेसची युनियन आम्ही संपविली. मात्र त्याच ठिकाणी मागच्या बाजूने या भाजपवाल्यांनी युनियन काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी आपण संजय राऊत यांनाही सांगितल्या आहेत. लवकरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सर्व तक्रारींचा सोक्षमोक्ष लावू. जिल्हा परिषद व मनपातील युतीबाबतही चर्चा केली जाईल त्याबाबत निर्णय झाल्यानंतर भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shena sabha mahajan patil