शिवाजीनगर पूल काढण्यासाठी उद्या पाच तासांचा "मेगा ब्लॉक' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी (9 एप्रिल) पाच तासांचा "मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. 

जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी (9 एप्रिल) पाच तासांचा "मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने त्याला पाडून नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन पूल उभारणीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे साधारण महिनाभरापासून जोरदार कामास सुरवात झाली असून, सर्व बाजूंनी पुलाचे कठडे तोडण्यात आले आहेत.

 
दोनशे टनच्या तीन क्रेन 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे जुने संपूर्ण स्ट्रक्‍चर काढण्यात आले आहे. तसेच चारही बाजूंच्या भिंती पाडण्यात आल्या असून, पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी (9 एप्रिल) "मेगा ब्लॉक' करण्यात येणार आहे. पुलाचा लोखंडी ढाचा उचलण्यासाठी दोनशे टनच्या तीन क्रेन आणण्यात आल्या आहेत. हा ढाचा उचलल्यानंतर पुलाच्या पुढील बांधकामास सुरवात होणार आहे. 

रेल्वे उशिरा धावणार 
पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पाच तासांचा "मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. सकाळी सव्वाआठला जळगाव स्थानकावरून भुसावळकडे "महाराष्ट्र एक्‍स्प्रेस' गेल्यानंतर "मेगा ब्लॉक' घेऊन कामाला सुरवात केली जाणार आहे. या पाच तासांत सुटणाऱ्या सर्व रेल्वे उशिरा सोडण्यात येणार असून, काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. 

113 वर्षे जुना पूल 
मध्य रेल्वेमार्गावर ब्रिटिश राजवटीत 1913 मध्ये शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामास 2013 मध्येच 100 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आता या पुलाची आयुष्यमर्यादा संपल्याने पूल केव्हाही कोसळण्याची शक्‍यता होती. यासंदर्भातील पत्र ब्रिटिश सरकारने रेल्वे प्रशासनाला आधीच दिलेले असल्याने हा पूल तोडून नव्या उड्डाणपुलाची तातडीने उभारणी करणे आवश्‍यक होते. मात्र, रेल्वे आणि महापालिका यांच्यातील पत्रव्यवहाराचा खेळ बराच काळ चालल्याने आता या पुलाच्या कामास सुरवात होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivaji nagara railway brige tomarro megablock