एकच चूक अन्‌ अमळनेर "हॉट स्पॉट'...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

दांपत्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अमळनेर येथे नातेवाइकांच्या उपस्थितीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जळगाव : अमळनेर तालुक्‍यातील साळीवाड्यातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा अहवाल प्रलंबित असतानाच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. तथापि, हा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता त्याच्यावर शासकीय नियमांनुसार अंत्यसंस्कार करणे अपेक्षित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अहवाल प्रलंबित असताना देखील त्या महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. प्रशासनाच्या एवढ्या एका गाफिलपणामुळेच अमळनेर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून ते शहर बाधितांचा "हॉट स्पॉट' झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

जिल्ह्यातील अमळनेर तालुका हा कोरोनाचा "हॉट स्पॉट' ठरला आहे. या तालुक्‍यात कोरोनाचे तेरा "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले असून, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने साळीवाड्यातील दांपत्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. या दांपत्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अमळनेर येथे नातेवाइकांच्या उपस्थितीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मृतदेह स्वाधीन केलाच कसा? 
अहवाल येण्यापूर्वी कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या मृतदेहावर शासनाने दिलेल्या नियमांनुसार नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणे अपेक्षित होते. परंतु, अमळनेर साळीवाड्यातील महिलेचा अहवाल प्रलंबित असतानाच त्या महिलेचा मृतदेह रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांच्या स्वाधीन केलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. 

नातेवाइकांची होती अंत्ययात्रा 
साळीवाड्यातील महिलेचा मृतदेह रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांच्या स्वाधीन केला. यानंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. याबाबतची माहिती अमळनेर प्रशासनाला याबाबत संपूर्ण माहिती होती, हेही स्पष्ट झाले आहे. 

मुलाकडून प्रशासनाची दिशाभूल 
मृत महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वी पुणे येथून आला आहे. या महिलेचा अहवाल प्रलंबित असताना देखील त्या मुलाने आपल्याला जळगावातील डॉक्‍टरांचा फोन आला असून, त्यांनी आईचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितल्याची बतावणी करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. 

म्हणूनच वाढले रुग्ण 
अमळनेर तालुक्‍यातील "त्या' दांपत्याच्या संपर्कात अनेक जण आले आहेत. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांचा समावेश आहे. या दांपत्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. यातील पाच जणांना अहवाल "पॉझिटिव्ह' आला. त्यांच्या संपर्कात आलेल्यांमुळेच अमळनेर तालुक्‍यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. तसेच या सर्व "पॉझिटिव्ह' रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. 

कोरोना अपडेट्‌स (सायंकाळी पाच पर्यंत) 

एकूण संशयित ः 450 
पॉझिटिव्ह ः 18 
निगेटिव्ह अहवाल ः 355 
प्रलंबित अहवाल ः 79 
मृत्यू ः 04 
नवे संशयित ः 33 

मृतांची संख्या 
2 एप्रिल ः 1 वयोवृद्ध 
18 एप्रिल ः 1 महिला 
21 एप्रिल ः 1 पुरुष 
23 एप्रिल ः 1 वयोवृद्ध 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon A single mistake and Amalner corona "hot spot"