अंगणात खेळत असलेल्या चिमुरडीला घरात नेत केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

पीडित बालिकेला त्रास होऊ लागल्याने तिने आजीला सांगितले. आजीने चिमुरडीची चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. संशयित पळून जाण्याच्या तयारीत असतानाच जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालत ताब्यात घेतले.

जळगाव : अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुरडीला घरात बोलावून एकसष्ट वर्षीय नराधमाने दारुच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला. ही संतापजनक घटना आज शहरात घडली. पीडित बालिकेला त्रास होऊ लागल्याने तिने आजीला सांगितले. आजीने चिमुरडीची चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. संशयित पळून जाण्याच्या तयारीत असतानाच जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालत ताब्यात घेतले. रवींद्र पूना रंधे (वय 61) असे संशयिताचे नाव आहे. 

"डीवायएसपीं'ची धाव 
पीडित चिमुरडी घराजवळील एका शासकीय कार्यालयाच्या भिंतीजवळ कुत्र्याच्या पिलांजवळ खेळत होती. दुपारी एकच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या रवींद्र रंधेने बालिकेस घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. पीडिता तिच्या घरी आल्यानंतर असह्य वेदनेने विव्हळू लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. तिच्या आजीने जवळ घेत तिला विचारपूस केली. चिमुरडीने संशयिताचे नाव सांगताच कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत निरीक्षक अकबर पटेल यांनी वरिष्ठांना घडला प्रकार कळवताच अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

पळून जाण्याच्या बेतात असताना.. 
पीडित बालिकेस जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर निरीक्षक पटेल यांनी तत्काळ गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना संशयिताच्या घराजवळ पाळत ठेवण्याच्या सूचना केल्या. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच घराजवळ संशयित रवींद्र रंधे याला काहीतरी घडत असल्याची चाहूल लागली. कोणाला कळण्याच्या आतच पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिस नाईक जितेंद्र सुरवाडे, अविनाश देवरे, नाना तायडे, भटू नेरकर, यांच्या पथकाने झडप घालतच संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रंधे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ तपास करीत आहेत. 

पुराव्यांचे संकलन 
घडल्या प्रकारात संशयिताचे घर "सिझ' करण्यात आले असून, घटनास्थळावरून पोलिस पथकाने उपलब्ध पुरावे, त्यात संशयिताच्या अंगावरील कपडे ताब्यात घेतले आहेत. पीडितेच्या तपासणीत प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी रवींद्र रंधे याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक केली. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon small girl Torture 65 year old man home