सौरऊर्जेतून वर्षाला 45 लाख युनिट वीज 

राजेश सोनवणे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे. याद्वारे वर्षाकाठी 45 लाख युनिट वीजनिर्मिती करून "महावितरण'ला देत आहेत. 

जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे. याद्वारे वर्षाकाठी 45 लाख युनिट वीजनिर्मिती करून "महावितरण'ला देत आहेत. 
गेल्या काही दशकांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा या इंधनांच्या वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडसारख्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे "ग्लोबल वॉर्मिंग'चे संकट उभे राहिले आहे. शिवाय कोळशाचा तुटवडा जाणवल्यानंतर "महावितरण'कडून अघोषित भारनियमन केले जाते. परंतु आजच्या युगात विजेशिवाय पर्याय नाही. वीज नसली, की प्रत्येकजण अस्वस्थ होत असतो. यामुळे वीज गेल्यास घरात अडचण होऊ नये, यासाठी "इन्व्हर्टर'चा पर्याय उपलब्ध झालेला आहे. परंतु, अलीकडे इन्व्हर्टरची बॅटरी पूर्ण चार्जिंग होऊ शकेल इतका वेळही वीज राहत नसल्याने समस्या वाढली. प्रामुख्याने ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवतो. याला पर्याय म्हणून अक्षय ऊर्जा असलेल्या सौरऊर्जेवरील उपकरणांचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात 344 पॅनल 
घराच्या छतावर फोटो व्हॉल्टाईक पॅनल उभारून सौर वीज नेट मिटरींगद्वारे महावितरणच्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. असे खानदेशातील 535 जणांनी घरांवर पॅनल बसवून ते सौर उर्जेद्वारे महावितरणला वीज देणारे ग्राहक बनले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 344, धुळ्यात 140 आणि नंदुरबार जिल्ह्यात 51 जणांनी पॅनल बसविलेले आहेत. यातून साधारण 45 लाख युनिट वीज निर्मिती करून यंदा सव्वाकोटी रुपयांच्या बिलाची बचत या 535 ग्राहकांकडून होत आहे. 

जिल्ह्यासह धुळ्यातही सौर प्रकल्प 
केंद्र शासनाने 1 लाख 75 हजार मेगावॉट इतकी वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्याचा पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जेची मागणी वाढत असून, जिल्ह्यात चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. यात जैन इरिगेशनने सहा वर्षांपूर्वी आठ मेगावॉटचा "फोटो व्होल्टाइक' प्रकल्प सुरू आहे. तर चाळीसगाव तालुक्‍यातही दीडशे मेगावॉटचे दोन प्रकल्प सुरू झाले आहेत. तर मोर धरणाजवळ 60 मेगावॉटच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून, याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय साक्री (धुळे) येथे दीडशे मेगावॉट आणि दोंडाईचा येथे महाजेनकोचा 500 मेगावॉटच्या प्रकल्पाची उभारणी होत आहे. 

घरांवर सौर वॉटर हिटर 
विजेचे हिटर किंवा गॅस गिझरद्वारे पाणी गरम करणे आजच्या स्थितीला परवडणारे नाही. कारण विजेचे व गॅसचे वाढलेले दर यामुळे हा वापर अनेकजण टाळत आहेत. याला पर्याय म्हणून सौर वॉटर हिटर उपलब्ध असून, घराच्या गच्चीवर बसविण्यासाठी दोनशे लिटरपासून एक हजार लिटर पाणी क्षमतेचे वॉटर हिटर उपलब्ध असल्याने ही सिस्टिम बहुतांश जणांच्या घरांवर बसविलेली पाहण्यास मिळते. याशिवाय घराच्या छतावर "फोटो व्होल्टाईक पॅनल' उभारून सौर वीज "नेटमीटरिंग सिस्टिम'द्वारे "महावितरण'च्या लोकल फिडरमध्ये साठविता येते. त्या बदल्यात रात्री "महावितरण'ची वीज घ्यावी, वीज साठविण्यासाठी बॅटरीची गरज भासत नाही. हे पॅनल देखील गेल्या दोन- तीन वर्षात बहुतांश घरांवर लावलेले पाहण्यास मिळत आहेत. 

सौरपंपांची प्रतीक्षा 
विजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असतात. यात शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकत नाही. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचे जाहीर केले आहे. "महावितरण'च्या माध्यमातून हे कृषिपंप दुर्गम भागात दिले जाणार असून, जळगाव जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना सोलर कृषिपंप देण्याचे काम "महावितरण'कडून करण्यात येणार आहे. मात्र, सौर कृषिपंप वितरणाची अद्याप प्रतीक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon solar panal 45 lakh unit