esakal | "एसटी'कडून 1050 ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड! 

बोलून बातमी शोधा

"एसटी'कडून 1050 ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड! }
uttar-maharashtra
"एसटी'कडून 1050 ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड! 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) विविध सवलत योजनांसाठी "स्मार्ट कार्ड' योजना राज्य सरकारने लागू केली आहे. त्याचा 65 लाख प्रवाशांना लाभ मिळणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत 50 लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. यात जळगाव आगारातून महिनाभरात एक हजार 50 ज्येष्ठांना "स्मार्ट कार्ड' देण्यात आले. 
एसटी बसने प्रवास करताना सवलती घ्यायच्या असतील, तर प्रवाशांना आधार कार्ड सक्तीचे असल्याबाबतचा गैरसमज काही वाहकांमध्ये आहे. यामुळे "स्मार्ट कार्ड' योजना सुरू केली आहे. परंतु "स्मार्ट कार्ड' मिळत नाही तोपर्यंत मतदान ओळखपत्र, लायसन्स, आधार कार्ड यांसह विविध ओळखीचे पुरावे ग्राह्य धरूनच प्रवाशांना सवलत देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील 15 योजनांसाठी लाभार्थ्यांना "स्मार्ट कार्ड' देण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यानुसार एप्रिलपासून "स्मार्ट कार्ड'साठी नोंदणी आणि कार्ड वाटप करण्यास सुरवात करण्यात आली. यात व्यक्तिगत कार्ड आणि सामायिक कार्ड असतील. वैयक्तिक कार्ड केवळ योजनाधारकांना वापरता येणार असून, सामायिक "स्मार्ट कार्ड' कुटुंबातील सदस्यांनाही वापरता येणार आहे. 

ज्येष्ठांना वितरण 
"स्मार्ट कार्ड' तयार करण्यासाठी संबंधितांना 55 रुपये खर्च येणार आहे. कार्डासाठी 50 रुपये, तर अर्जासाठी 5 रुपये शुल्क लागणार आहे. हे शुल्क देऊन आगारातच याची ऑनलाइन नोंदणी करून त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. ज्येष्ठांचे कार्ड वितरण करण्यात येत असून, गेल्या महिनाभरात जळगाव आगारात एक हजार 50 ज्येष्ठांना कार्ड वितरीत करण्यात आले. या कार्डामधील सामायिक कार्डधारकांना सुरवातीला तीनशे रुपये रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर शंभर ते पाच हजारांपर्यंत रिचार्ज उपलब्ध आहेत. हे "स्मार्ट कार्ड' डेबिट कार्डप्रमाणे वापरता येणार आहे. 

अपंगांना वितरणात घोळ 
ज्येष्ठ नागरिकांसोबत अपंग तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींनाही "एसटी'चे "स्मार्ट कार्ड' देण्यात येत आहे. मात्र, अपंगांच्या "स्मार्ट कार्ड' नोंदणीत घोळ झाल्याची माहिती समोर येत आहे. अपंगांना कार्डाची नोंदणी करताना शंभर टक्‍के सवलतीच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नोंदणीसाठी एका जणाला प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याऐवजी दुसऱ्याच कर्मचाऱ्याला नोंदणीसाठी बसविल्याने सदरचा प्रकार घडला आहे. याबाबत मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडून जळगाव विभागाला पत्रही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.