"लालपरी'च्या चाकांचा "लॉक'डाउन खुलला; ग्रामीण भागातही जाणार! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

ग्रामीण भागात कोठेही बस मुक्‍कामी थांबविण्याचे "शेड्यूल्ड' ठेवण्यात आलेले नाही. बसफेऱ्या सुरू करताना प्रवासात ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांआतील मुलांना परवानगी देण्यात आलेली नाही. 
 

जळगाव :  "लॉकडाउन'मुळे दोन महिन्यांपासून चाके आणि स्टिअरिंग "लॉक' झाले होते. मजुरांना सोडण्याच्या निमित्ताने काहीसा शिथिल झालेला "लॉक' आता खोलण्यात आला असून, ग्रामीण भागाची "जीवनवाहिनी'ची चाके गावांमधील खडतर रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत; परंतु नियमित फेऱ्यांची संख्या कमी करून विभागातून 50 बस सोडण्याचे प्राथमिक नियोजन आहे. यात "रेड झोन' असलेल्या जळगाव शहरात बसप्रवेशास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले. 

"कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे. तो रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून "लॉकडाउन' सुरू आहे. "लॉकडाउन'मुळे सर्व वाहतूक सेवेलाही "लॉक' लावण्यात आले होते; परंतु पंधरा दिवसांपासून "लॉकडाउन' थोडा शिथिल करत मजुरांना घरी जाण्यासाठीची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवादेखील सुरू करण्याचे आदेश होते. त्यानुसार दहा- बारा दिवसांपासून बावीस प्रवासी घेऊन बस मजुरांना घेऊन धावत आहे; परंतु आता जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले. 

पन्नास बसचे नियोजन 
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात आठशेहून अधिक बस असून, नेहमी दिवसभरात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील साडेसातशे बस सोडण्यात येत असतात; परंतु "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करून 22 प्रवासी घेऊन बस सोडण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यांतर्गत आगारातून तीन- चार बसनुसार 50 गाड्या सोडण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. 

जळगाव आगार बंदच 
जिल्ह्यातील "कोरोना'चा संसर्ग वाढत असून, यात जळगाव शहर परिसर "रेड झोन'मध्ये आहे. यामुळे उद्यापासून (ता. 22) सुरू होणाऱ्या बससेवेतून जळगाव आगार वगळण्यात आले आहे. जळगाव आगारातून बस सोडण्यात येणार नाहीत किंवा आगारात बाहेरची बस प्रवेश करण्यास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अर्थात, जळगाव आगार वगळता सर्व आगारांमधून बस सोडण्यात येणार असून, काही फेऱ्या या ग्रामीण भागातदेखील सोडण्यात येणार आहेत. 

बसस्थानक केले सॅनिटाइझ 
जळगाव विभागातील आगारांमधून बस सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक बस सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, बसमधून प्रवासी येणार असल्याने जळगावचे संपूर्ण बसस्थानक आवार आज दुपारी सॅनिटाइझ करण्यात आले. स्वच्छता करून येथे फवारणी करण्यात आली. 

बारा तासांचे "शेड्यूल्ड' 
जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात येत असून, त्यासाठी बारा तासांचे "शेड्यूल्ड' आखण्यात आले आहे. त्यानुसार आगारातून सकाळी सातला पहिली बस निघेल. अर्थात, सकाळी सात ते सायंकाळपर्यंत बसफेऱ्या असतील. दरम्यान, ग्रामीण भागात कोठेही बस मुक्‍कामी थांबविण्याचे "शेड्यूल्ड' ठेवण्यात आलेले नाही. बसफेऱ्या सुरू करताना प्रवासात ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांआतील मुलांना परवानगी देण्यात आलेली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon st buses starte and rular Even in rural areas