
जळगाव : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी "लालपरी' आता या मार्गावरून दूर होताना दिसत आहे. अगोदरच अनियमित फेऱ्यांमुळे प्रवासी संख्या मिळणे कठीण असताना तीस टक्के पेक्षा कमी भारमान (प्रवासी संख्या) असलेल्या बसफेऱ्यांना थांबा लागणार आहे. याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक झाल्यानंतर याबाबतचे पत्र आगार प्रमुखांना देण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील फेऱ्यांना बसणार आहे.
"गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस' हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली. यामुळे महामंडळाची "लालपरी' बस मुंबईकरांच्या लोकलप्रमाणे जीवनवाहीनी झाली होती. परंतु अलीकडच्या काळात प्रवासाची अनेक साधने झाली. ग्रामीण भागात देखील प्रत्येकाकडे दुचाकी असल्याने एसटीचा प्रवास दुरापास्त झाला. यामुळे महामंडळाची बस ज्येष्ठ नागरिक, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी, वनफोर्थ तिकीट अशा सवलत धारकांसाठी उरली. अर्थात मागील दहा वर्षाच्या तुलनेत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. याचा परिणाम एसटीला मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील होत आहे.
सर्वेक्षण करून मागविला अहवाल
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे बसफेऱ्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाचे उत्पन्न कमी झाले असून, राज्यातील तोटा साधारण चार हजार 500 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. यात जळगाव विभागातील जळगाव, एरंडोल हे आगारांचे उत्पन्न घटले असून विभागात जळगाव आगार नवव्या क्रमांकावर आहे. अशा भारमान कमी झालेल्या आगारांना पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक फेरीचे सर्व्हेक्षण केले जाणार असून यात शालेय विद्यार्थी संख्या किती? दुसरी फेरी असल्यास तिची उपयुक्तता आहे का? 30 टक्के कमी भारमान असलेल्या फेऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून, त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयाकडे मंगळवारपर्यंत (14 जानेवारी) पाठवायचा आहे.
फेऱ्या चुकविणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही लक्ष
भारमान कमी होण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. यात थांब्यावर बस न थांबविणे, आणि चालक- वाहक हे काही फेऱ्या बुडवत असतात. अशा फेऱ्या बुडविणाऱ्या चालक- वाहकांवर देखील आता लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन मध्यवर्ती कार्यालयाने केले आहे.
ग्रामीण भागालाच अधिक फटका
"गाव तिथे बस' या ब्रीदमुळे ग्रामीण भागाशी महामंडळाची बस जुळली आहे. परंतु, महामंडळाच्या वाढणाऱ्या तोट्यामुळे कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका ग्रामीण भागालाच अधिक बसणार आहे. कारण 30 टक्के कमी भारमानमध्ये ग्रामीण भागातीलच बसफेऱ्या कमी होतील. परिणामी खासगी प्रवासी वाहतुकीला देखील एकप्रकारे चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.