बियाण्यांचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई : कृषिमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

राज्य शासनाच्या 22 मेच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्न झालेले नसतील तरीही अशा शेतकऱ्यांना किमान 50 टक्के कर्जमुक्ती द्यावी. उर्वरित 50 टक्के कर्जमुक्ती आधार संलग्नीकरण झाल्यावर द्यावी,

जळगाव  : कृषी विभागाकडे त्यांच्या मागणीपेक्षाही जास्त खते, बियाण्यांचा पुरवठा शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी खते तसेच प्रमाणित बियाण्यांची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते तसेच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. खते, बियाणे विक्रेत्यांनी खतांचा किंवा बियाण्यांचा तुटवडा आहे असे भासवून त्यात काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे 
कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज येथे दिल्या. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, महसूल, पुरवठा, सहकार, कृषी, मार्केटिंग, बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

मंत्री भुसे म्हणाले, की बॅंकांनी शेतकऱ्यांबाबत सामाजिक भावनेतून विचार करून कर्ज देताना पारदर्शकतेसोबतच लवचिक धोरण अवलंबणे आवश्‍यक आहे. महात्मा फुले कर्जमुक्तीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. राज्य शासनाच्या 22 मेच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्न झालेले नसतील तरीही अशा शेतकऱ्यांना किमान 50 टक्के कर्जमुक्ती द्यावी. उर्वरित 50 टक्के कर्जमुक्ती आधार संलग्नीकरण झाल्यावर द्यावी, अशा सूचनाही बैठकीस उपस्थित बॅंकांच्या प्रतिनिधींना दिल्या. 
मंत्री भुसे म्हणाले, की पणन महासंघाने, बाजार समित्यांनी कापूस, ज्वारी, मका खरेदी लवकरात लवकर करावी. जेणे करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडील 100 टक्के मालाची खरेदी केली जाईल. हे करताना कापूस, ज्वारी, मका हा शेतकऱ्यांकडीलच खरेदी होईल, याची विशेष काळजी घ्यावी. 
पालकमंत्री पाटील यांनी मंत्री भुसेंकडे जिल्ह्याच्या विकासातील मुख्य घटक, जिल्ह्याचे मुख्य पीक केळीसाठी केळी महामंडळाची निर्मिती व्हावी, लिंबू प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्राची मागणी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला "लॉकडाउन' उठविल्यानंतर पालकमंत्री, जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर, लीड बॅंकेचे अरुण प्रकाश, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा मार्केटिंग विभागाचे अधिकारी आदींनी कर्जमुक्ती योजना, खरीप हंगामपूर्व तयारी, खते बियाण्यांची उपलब्धता, वितरण व्यवस्था, भरड धान्य तसेच कापूस खरेदी विषयी सविस्तर माहिती सादर केली. 
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते, बियाणे, शेतकरी ते थेट ग्राहक या तत्त्वानुसार हापूस आंबा, तांदळाचे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोच या मोहिमेचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रारंभ पालकमंत्री पाटील, मंत्री भुसे यांनी अजिंठा विश्रामगृहात या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Strict action in case of black marketing of seeds: Agriculture Minister Dada Bhuse