अन पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू ! - तमिळनाडूत अडकलेले विद्यार्थी जळगावला परतले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तमिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव एस.टी.बस स्थानकात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

जळगाव ः कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तमिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव एस.टी.बस स्थानकात आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सॅनिटायझर देवून त्यांनी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. आपल्या गावी सुखरूप पोचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. दोन महिन्यापासून मुलांच्या भेटीची आस लागलेल्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

कोरोना या संसर्गजन्य विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तमिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यांना आर्थिक अडचणींसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनीपालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना जळगावात आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुरावा करून पालकमंत्री पाटील यांनी सकारात्मक विचार करून ही मागणी पूर्ण केली. 

राज्य सरकारने पुढाकार घेतल्यानंतर 160 विद्यार्थ्यांना तमिळनाडू येथून थेट सांगली (मिरज) येथे आणण्यात आले. तेथून बसेसद्वारे जळगावपर्यंत विद्यार्थ्यांना पोचविण्यात आले.  जळगाव बसस्थानकात आज 160 विद्यार्थ्यांना घेऊन सात बसेस दुपारी 12 वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, आगार स्थानक प्रमुख नीलिमा बागूल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण, रमेश पाटील, विद्यार्थ्यांचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon student in tamilnadu come back

टॉपिकस