विद्यार्थी रमले "डिजिटल' विश्‍वात..."लॉकडाउन' काळातील वेळेचा सदुपयोग ​

अमोल महाजन 
गुरुवार, 23 एप्रिल 2020

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन "ऑनलाइन' सराव पेपर सोडविण्यावर भर दिला जात असून, तज्ज्ञ शिक्षकांचे व्याख्यानेही होत आहेत. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासात काहीतरी नवीन बदल घडवून आणायला महत्त्वाचा वेळ मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरूच ठेवून ऐनवेळी तारीख जाहीर झाल्यास परीक्षेसाठी सज्ज राहावे. 

 प्रा. प्रीती अग्रवाल, संचालिका, रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगाव 

जळगाव  : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' तीन मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. घरात बसून कंटाळा आल्याने मोबाईल हा विद्यार्थ्यांचा अभ्यासू दोस्त बनला आहे. या वेळेचा चांगला उपयोग होत असून, तज्ज्ञांचे व्याख्यान किंवा सराव पेपर सोडविण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अभ्यासातील अडचणी सोडवीत आहेत. यामुळे त्यांचा घरातील वेळही चांगला जात आहे आणि अभ्यासातून नवीन काही शिकत असल्याने ते रमले असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

"कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव पाहता, "डिजिटल शिक्षणा'शिवाय पर्याय नाही. "लॉकडाउन'च्या काळात शिक्षणपद्धतीत महत्त्वाचे बदल होत असतील, तर ते फायदेशीर ठरणार आहेत. आज देशातील काही विद्यापीठांत ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, तसेच विद्यार्थी घरी बसूनच अभ्यासात रममाण झाल्याचे पाहून पालकांमध्येही आनंद व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत पूर्वनियोजन सुरू आहे. "कोरोना'च्या प्रादुर्भावाने विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. विद्यार्थी व पालक यामुळे चिंतित आहेत. परीक्षा कधी होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे. "लॉकडाउन'मुळे पाल्य घरी बसूनच डोळ्यांसमोर अभ्यास करताना पाहून पालकही आनंदित होत आहेत. 

"ऑनलाइन' परीक्षेचा फायदाच 
"ऑनलाइन' परीक्षा घेण्याचा विचार विद्यापीठाने केल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे; परंतु अशी परीक्षा घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. "ऑनलाइन' परीक्षा घेतल्यास "ऑब्जेक्‍टिव'साठी अडचणी येणार नसून, "सबजेक्‍टिव' परीक्षेला अडचणी आल्यास मार्ग काढता येणार आहे. 

"ऑनलाइन' अभ्यास फायदेशीर 
"लॉकडाउन'मुळे विविध महाविद्यालयांनी "ऑनलाइ'नद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विद्यार्थी याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. विद्यार्थ्यांना "ऑनलाइन'द्वारे गांभीर्य समजले आहे. "ऑनलाइन' अभ्यास टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वेळोवेळी संपर्कात राहणे गरजेचे आहे. 

परीक्षांबाबत संभ्रम 
राज्यात तीन मेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदी वाढविल्याने विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. "कोरोना'चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने राज्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा भूगोलाचा पेपर स्थगित करण्यात आला आहे; तर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापाठोपाठ नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द केली. आता पदवी, पदव्युत्तर आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमध्ये आमच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावयास हवा. वेळ ही आयुष्यातील सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे. ती आपल्याला मिळालेली असून, याचा उपयोग विद्यार्थ्यांनी वर्तमान व भविष्यासाठी केला पाहिजे. स्वतःला ओळखून नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे, ज्ञानात भर घातल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल राहील. 

यजुर्वेंद्र महाजन, संचालक, दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Students play in the "digital" world good use of time in the lockdown