"कोरोना'चे सावट...जळगाव शहरातील 23 हजार घरांचे सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

शहरात गेल्या सोळा दिवसांपासून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या दवाखाना विभागाकडून शहरातील कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात तसेच इतर परिसरात घरोघरी जाऊन घरात कोणी आजारी आहे का? याची प्राथमिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

जळगाव :  शहरात सोळा दिवसांपूर्वी मेहरुण परिसरात पहिला "कोरोना'चा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांत सालारनगरात दुसरा रुग्ण आढळल्याने जळगावकरांसह प्रशासन हादरले होते. महापालिकेच्या दवाखाना विभागाकडून मेहरुण, सालारनगर परिसरात घरांतील नागरिकांचे आरोग्य 
तपासणी व सर्वेक्षणाचे काम तत्काळ हाती घेतले. तसेच शहरातील इतर भागात देखील महापालिकेच्या दवाखाना विभागाचे सुमारे 200 डॉक्‍टर, परिचारिका आदी कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू असून, आतापर्यंत 23 हजार 409 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

शहरात गेल्या सोळा दिवसांपासून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या दवाखाना विभागाकडून शहरातील कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात तसेच इतर परिसरात घरोघरी जाऊन घरात कोणी आजारी आहे का? याची प्राथमिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांचे कोरोनाबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ही मोहिमेत सातत्याने संपूर्ण शहरात राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका दवाखाना विभागाचे प्रमुख डॉ. राम रावलानी यांनी दिली. 

मेहरुण परिसराचे सर्वेक्षण संपले 
मेहरुण परिसरात महापालिकेच्या दवाखाना विभागाच्या 51 पथकाद्वारे तपासणी सर्वेक्षण सुरू केले. गेल्या चौदा दिवसापर्यंत सतत तपासणी मोहीम राबवून 2 हजार 649 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात 17 हजार 125 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर सालारनगरचे सर्व्हेक्षण सुरू असून, 16 पथकाद्वारे आतापर्यंत 752 घरांचे सर्वेक्षण तर 3 हजार 767 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण शहरातील घरांचे सर्वेक्षण करून प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Survey of 23 thousand houses in Jalgaon city