साखर वाटप न करणाऱ्या रेशन दुकानांचे निलंबन... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यात रेशन कार्ड धारकांना साखर मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तालुक्‍यात रेशन दुकाने तपासणीची धडक मोहीम राबविली.

जळगाव  : जिल्ह्यात रेशन कार्ड धारकांना साखर वाटप न करणे, पावती न देणे, रेकॉर्ड अद्यावयत न ठेवणे आदी कारणांवरून रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यातील पाच दुकानांचे निलंबन तर एक रद्द करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केली आहे. या धडक कारवाईने रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यात रेशन कार्ड धारकांना साखर मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तालुक्‍यात रेशन दुकाने तपासणीची धडक मोहीम राबविली. त्यात वटार (ता.चोपडा) येथील शिवाजी पाटील यांचे दुकानात तपासणी करता अनेक बाबींत अनियमितता आढळून आली, तक्रारींच्या अनुषंगानेही चौकशी करून हे दुकानच रद्द करण्यात आले. 

शिंगाडी (ता.रावेर) येथील महेंद्र बघाडे यांचे दुकान सहा महिने निलंबित केले, ऐनपूर येथील कल्पना रमेश महाजन यांचे रेशन दुकान तीन महिन्यासाठी निलंबित केले, अजंदे येथील मगन पाटील यांचे दुकान, टाकरखेडा (ता.यावल) येथील लताबाई चौधरी यांचे रेशन दुकाने 3 महिन्यासाठी निलंबित केले आहे. रावेरच्या तहसीलदारांनी जर नियमितपणे रेशन दुकानांची तपासणी केली असती तर नागरिकांना वेळोवेळी धान्य, साखर मिळाली असती. आणि पुरवठा अधिकाऱ्यांना धडक तपासणी मोहीम हाती घ्यावी लागली नसती असे नागरिकांना वाटते. 

या कारणांमुळे झाली कारवाई 
रेशन कार्डधारकांना साखर वाटप न करणे, धान्य विकल्याची पावती न देणे, पूर्ण धान्य न देणे, रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे, शिल्लक मालाचा साठा भरपूर प्रमाणात आढळणे. 

संयुक्त समितीची स्थापना 
रावेर, यावल तालुक्‍यातील जी रेशन दुकाने निलंबित केली आहे. त्यांना ग्रामसेवक, तलाठी, पुरवठा निरीक्षक यांच्या उपस्थितीत साखर वाटप करायला सांगण्यात आले आहे. त्यांची एक समिती स्थापन करून साखर वाटपाचा अहवाल देण्यास सांगण्यात आला आहे. 

धान्य वाटपाचा अगोदरच थंब..
रावेर तालुक्‍यात अनेक रेशन दुकानदार मोटार सायकलीवर फिरून रेशन कार्ड धारकांचे धान्य, साखर वाटपापूर्वीच पॉज मशिनने "थंब' घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जर धान्य, साखर वाटपापूर्वीच थंब रेशन कार्ड धारकांनी दिला याचा अर्थ त्याला धान्याचे वाटप झाले. मात्र प्रत्यक्षात रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याचा प्रकार येथे झाला आहे. याबाबतही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Suspension of ration shops that do not distribute sugar